प्रत्येक क्षेत्रातील स्त्री ही सन्मानास पात्र – शोभा धारिवाल यांचे मत

पुणे :  स्त्रिया समाजातील वेगवेगळ्या घटकांमध्ये कार्य करतात. प्रसंगी लढा देखील देतात. घरातील गृहिणीपासून एखाद्या उद्योजिकेपर्यंत प्रत्येक स्त्री ही सन्मानास पात्र असते. प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया मनापासून आणि स्वत:ला झोकून देत कार्य करतात. कोरोनाच्या काळात देखील स्त्रियांनी उत्तम काम केले आहे, असे मत सामाजिक कार्यकर्त्या शोभा धारिवाल यांनी व्यक्त केले. 
सदाशिव पेठेतील नवा विष्णु चौक नवरात्र मंडळ, बाजीराव रस्ता तर्फे जागर नवचैतन्याचा, सन्मान स्त्रीशक्तीचा उपक्रमांतर्गत ९ दुर्गांचे पूजन व सन्मान वरदश्री सभागृह येथे करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष कुमार रेणुसे, संगीता रेणुसे, सविता शेंडकर, संगिता खंडाळकर, स्नेहल जाधव, वैशाली यादव, उत्तम वालगुडे, संतोष खंडाळकर, बाबासाहेब पायगुडे, मंगेश यादव आदी उपस्थित होते. 
विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना कटके, प्लाझ्मा दान करणा-या सोनाली जाधव, आरोग्यविषयक जागृती करणा-या शोभा बनसोडे, गरवारे कोविड सेंटरमध्ये काम करणा-या डॉ.स्वानंदी केळकर, डॉ.भावना टोकापूरे, नगरसेविका अ‍ॅड.गायत्री खडके, पुणे मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ.सिद्धी राजहंस, प्राण्यांना खाद्य पुरविणा-या वेत्रावती येवलेकर, कोरोनाच्या काळात ज्येष्ठ व रुग्णांना जेवणाचे डबे देणा-या ह.भ.प.जयश्री देशपांडे यांचे पूजन आणि सन्मान करण्यात आला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, देवीची फ्रेम, फळांची परडी असे सन्मानाचे स्वरुप होते. 
शोभा धारिवाल म्हणाल्या, कोणत्याही घरातील गृहिणी ही आपल्या संपूर्ण कुटुंबाचा सांभाळ मनापासून करते. त्याचप्रमाणे समाजात ज्या क्षेत्रात ती स्त्री कार्यरत असते, तेथे देखील आपलेपणाच्या भावनेने कार्यरत असते. त्यामुळे समाजातील अशा संस्था किंवा मंडळांनी स्त्रियांचा केलेला सन्मान त्यांच्यासाठी प्रेरणादायी आहे. यामुळे त्या अधिक जोमाने कार्य करु शकतील. 
सन्मानाला उत्तर देताना जयश्री देशपांडे म्हणाल्या, कोरोनाच्या काळात काही ठिकाणी माणुसकी हरवत असल्याचे चित्र पहायला मिळाले. जवळचे नातेवाईक, मित्र देखील मदतीला आले नाहीत. शेजारी राहणारे देखील सोबत नव्हते, अशा काळात आम्ही जेवणाचे डबे देण्याचे कार्य केले. त्यातून खूप काही शिकायला मिळाले. 
कुमार रेणुसे म्हणाले, माणसात देव जागा आहे, हे वाक्य सार्थ करणा-या महिलांचा आम्ही सन्मान केला. कोरोनाच्या काळात पुरुषांप्रमाणे महिलांनी देखील उत्तम कार्य केले. जीवाची बाजी लावून पोलीस, डॉक्टर यांसह सामान्यांनी देखील गरजूंना मदतीचा हात दिला. त्यांचा योग्य सन्मान करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला, असेही त्यांनी सांगितले. श्रद्धा लोकरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा.संगीता मावळे यांनी सूत्रसंचालन केले. अपेक्षा दारवटकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: