‘उद्धव ठाकरेंचं दसरा मेळाव्याचं भाषण व्यासपीठावरूनच होईल’- संजय राऊत

मुंबई – दादरच्या शिवाजी पार्कात दसऱ्या मेळाव्याला होणारा अभूतपूर्व कार्यक्रम म्हणजे समस्त शिवसैनिकांसाठी एक पर्वणीच असते. ऊन, वारा, पाऊस या कशाचीच तमा न बाळगता दरवर्षी येथे दसरा मेळावा साजरा होतो. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दसरा मेळावा होणार की नाही याबाबत ठोस निर्णय झालेला नाही. यंदा उद्धव ठाकरे शिवाजी पार्कात मेळावा घेण्याऐवजी ऑनलाईन संवाद साधतील अशी चर्चा सुरू आहे. पण आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरेंचं भाषण व्यासपीठावरुनच होणार असल्याचं त्यांनी टीव्ही ९ शी बोलताना म्हटलं आहे.

ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे भविष्यही अधांतरीच असल्याचं शिवसेनेने सामना संपादकीयमधून म्हटलं होतं. मात्र, खासदार संजय राऊत यांच्या या विधानामु‌ळे साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. “उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असले तरी ते पक्षप्रमुख आहेत. त्यामुळे त्यांचं भाषण हे व्यासपीठावरूनच होईल,” असं सांगताना संजय राऊत यांनी याबद्दल सकारात्मक चर्चा सुरु असल्याची माहिती दिली आहे. “शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाइन होईल असं कोणी सांगितलं?,” अशी विचारणाही त्यांनी केली आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बिहारमधील १२ सभा कशा होणार आहेत याचा अभ्यास करु,” असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. “दसरा मेळावा शिवसेनेची परंपरा असून त्याचं सांस्कृतिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्व आहे. तसंच बऱ्याच वर्षानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला आहे. सरकारने आखलेल्या नियमांचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली जाईल. सध्या चर्चा सुरु असून एक दोन दिवसात निर्णय होईल,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: