ऑनलाईन श्रीसुक्त पठणातून श्री महालक्ष्मी मातेला नमन; १०० शाळांतील विद्यार्थ्यांचा सहभाग


पुणे : या देवी सर्वभूतेषु, शक्तीरुपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:… या देवी सर्वभूतेषु, बुद्धीरुपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:… असे देवीमंत्राचे स्वर श्री महालक्ष्मी मंदिरात निनादले. सामुहिक श्रीसुक्त पठणाच्या निमित्ताने निवडक महिलांनी मंदिरातून यामध्ये सहभाग घेतला. तर, १०० शाळांतील विद्यार्थ्यांनी आॅनलाईन पद्धतीने पठणात सहभाग घेत कोरोना संकट दूर करण्याकरीता श्री महालक्ष्मी चरणी साकडे घातले.  
श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित शारदीय नवरात्र महोत्सवात आॅनलाईन पद्धतीने सामुहिक श्रीसुक्त पठणाचा कार्यक्रम झाला. यावेळी आॅनलाईन पद्धतीने मंदिराच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, अ‍ॅड.प्रताप परदेशी, नगरसेवक प्रविण चोरबोले, विश्वस्त हेमंत अर्नाळकर, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल यांसह अनेक शाळांतील विद्यार्थी व भाविक सहभागी झाले होते. विश्वकर्मा विद्यालयाच्या शिक्षकांनी पुढाकार घेत हा कार्यक्रम केला. याशिवाय मंदिरात श्री महालक्ष्मी यज्ञ व श्रीसुक्त अभिषेक देखील पार पडला. मिलिंद राहुरकर यांनी पौरोहित्य केले.  
अमिता अग्रवाल म्हणाल्या, बुद्धीची देवता श्री महासरस्वती माता, ऐश्वर्याची माता श्री महालक्ष्मी माता आणि शक्ती देत अन्यायाविरुद्ध लढा देण्याची शिकवण देणा-या श्री महाकाली मातेचे नमन आपण नवरात्रामध्ये करतो. श्री सुक्त हे ॠग्वेदातील वैदिक सुक्त आहे. अतिशय दिव्य व फलदायी सुक्त आहे. श्रीसुक्त पठणाने केवळ धनच नाही, तर ऐश्वर्य, श्रीमंती, आरोग्य व मन:शांती मिळते, त्यामुळे सामुहिक श्रीसुक्त पठण दरवर्षी केले जाते. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, हा या कार्यक्रमामागील उद्देश आहे. दरवर्षी हजारो विद्यार्थी मंदिरासमोर यामध्ये सहभागी होतात. यंदा मात्र आॅनलाईन पद्धतीने हा कार्यक्रम झाला.

*भाविकांना आॅनलाईन पद्धतीने सहभागी व्हावे
नवरात्र महोत्सवामध्ये सकाळी ६ ते ७ व सकाळी ८ ते ९ या वेळेत भाविकांना आॅनलाईन संकल्प करुन अभिषेक करता येईल. मंदिरात दररोज श्री महालक्ष्मी महायाग (हवन) सकाळी ९ ते १ व संध्याकाळी ४ ते ८ व अष्टमी दिवशी श्रीदुर्गासप्तशती महायाग करण्यात येईल.  तसेच रोज सकाळी ७:१५ वाजता व संध्याकाळी ७:१५ वाजता महाआरती होईल. वरील सर्व पूजा या आॅनलाईन पध्दतीने केल्या जातील. श्री महालक्ष्मी मंदिराच्या वेबसाईट www.mahalaxmimandirpune.org यावरुन नाव नोंदणी करता येईल. मंदिराची वेबसाईट, फेसबुक पेज  व  युट्यूब तसेच स्थानिक केबलवर भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: