व्यवसायाभिमुख, कौशल्यपूर्ण शिक्षणावर भर हवा – विवेक वेलणकर यांचे मत

पुणे: “कोरोनामुळे नर्सिंग, लॅब टेक्निशियन, एक्स-रे टेक्निशियन, वैद्यकीय कर्मचारी यांचे महत्व अधोरेखित झाले आहे. आजच्या काळात व्यवसायाभिमुख आणि कौशल्याधारित मनुष्यबळाची मोठी मागणी आहे. त्यामुळे विद्यार्थिनींनी अशाप्रकारचे शिक्षण घेण्यावर भर द्यायला हवा,” असे मत सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी व्यक्त केले.

आशा प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने ‘आशा शिष्यवृत्ती सन्मान सोहळा’ पार पडला. ग्रामीण, दुर्गम भागातील, पुण्यातील वाडी-वस्ती भागातील गुणवंत आणि आर्थिक मागास २५ विद्यार्थिनींना नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने २५०० रुपयांची शिष्यवृत्ती, तसेच शैक्षणिक साहित्य देण्यात आले. पत्रकार भवन येथे झालेल्या सोहळ्यावेळी ‘आपलं घर’चे विजय फळणीकर, ‘आरोग्यभारती’चे प्रमुख डॉ. शिरीष कामत, मॅथ्स अकॅडमीचे सचिन ढवळे, आशा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अंजली लोणकर, पुरुषोत्तम डांगी आदी उपस्थित होते.

विवेक वेलणकर म्हणाले, “ग्रामीण भागातील विद्यार्थिनींमध्ये मोठी क्षमता असते. त्यांना दिशा दिली, योग्य मार्गदर्शन मिळाले, तर त्या स्वावलंबी होऊ शकतात. दहावी-बारावीनंतर स्वतःच्या पायावर उभे राहता येईल, अशा स्वरूपाचे अनेक छोटे-छोटे अभ्यासक्रम आहेत. डॉक्टर, अभियंता, अधिकारी होण्याबरोबरच रुग्णसेवा, लेखापाल, संगणक प्रशिक्षण घेतले तर नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतात.”

विजय फळणीकर म्हणाले, “लोकांमध्ये आपलेपणाची भावना जोपासणे गरजेचे आहे. नवीन कौशल्ये अभ्यासक्रम शिकण्यासह माणुसकी शिकावी. मिळालेल्या संधीचे आपल्याला सोने करता आले पाहिजे. आशा प्रतिष्ठानसारखे दातृत्ववान लोक समाजातल्या वंचित घटकांसाठी हात पुढे करतायेत, हे आशादायी आहे. शिक्षण समृद्ध, सामर्थ्यवान बनवण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे शिक्षणात मागे पडू नये.”

सचिन ढवळे यांनी स्पर्धा परीक्षांच्या संदर्भाने मार्गदर्शन केले. अंजली लोणकर यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. प्रा. सुनील मोरे व गणेश ठाकर यांनी सूत्रसंचालन केले. चंदन डाबी यांनी प्रास्ताविक केले.

Leave a Reply

%d bloggers like this: