शासनाकडून साहित्य संस्कृतीला नेहमीच दुय्यम स्थान का? – प्रा. मिलिंद जोशी

साहित्य परिषदेत ग्रंथपूजन करून वाचनप्रेरणा दिन साजरा                 

पुणे : टाळेबंदीनंतर समाजाला व्यसनाधीन करणारी मद्यालये प्रथम सुरू झाली आणि समाजमानस घडविणारी ग्रंथालये सुरू व्हावीत यासाठी आवाज उठवावा लागला ही खेदाची बाब आहे. शासनाकडून साहित्य-संस्कृतीला नेहमीच दुय्यम स्थान का? ही मानसिकता कधी बदलणार? असा सवाल महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी उपस्थित केला. महाराष्ट्र साहित्य परिषदेत प्रा. जोशी यांच्या हस्ते  ग्रंथपूजन आणि माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून  वाचनप्रेरणा दिन  साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, कार्यवाह वि दा पिंगळे, प्रमोद आडकर यावेळी उपस्थित होते.

प्रा. जोशी म्हणाले, सर्वच वाचकांना ग्रंथ विकत घेऊन वाचणे परवडत नाही. आपली वाचनभूक भागविण्यासाठी अनेक वाचक ग्रंथालयांवरच अवलंबून आहेत. गेली सात महिने वाचक आणि ग्रंथालय यांचा संपर्क तुटला होता. ग्रंथालय सुरू झाल्याने त्यांची पावले पुन्हा ग्रंथालयाकडे वळतील याचे समाधान आहे. वाचनसंस्कृतीला आव्हान देणारी नवीन माध्यमे तंत्रज्ञानामुळे जन्माला येत असतानाही वाचक वर्ग टिकवून ठेवण्याचे मोलाचे काम ग्रंथालयांनी केले आहे. भाकरी ही पोटाची गरज पण भावना जागवायला आणि मने फुलवायला विचारच उपयोगी पडतात ते केवळ पुस्तकातूनच मिळतात. या कोरोनाच्या संकटकाळात निराशेने ग्रासलेली आणि भीतीने काळवंडलेली मने प्रज्वलित करून समाजाला सकारात्मक ऊर्जा  देण्याचे  काम केवळ पुस्तकेच करू शकतील म्हणून पुस्तकांचे निवासस्थान आणि वाचनसंस्कृतीचे प्रवेशद्वार असलेली ग्रंथालये सुरू होत आहेत याचे समाधान आहे. वाचनालये सुरू झाल्यामुळे ठप्प झालेला साहित्य व्यवहार पूर्ववत होईल  यावर्षी निघणारे दिवाळी अंक वाचकांपर्यन्त पोचण्यासाठी मोठी मदत होईल. वाचकांच्या सुरक्षिततेसाठीची सर्व खबरदारी घेण्यात येईल.

Leave a Reply

%d bloggers like this: