fbpx
Monday, June 17, 2024
PUNE

शारीरिक व मानसिक तणावावर हास्य आरोग्यदायी – डॉ. जयदेव पंचवाघ

पुणे : ”कोव्हीडमुळे ताणतणाव, नैराश्य वाढले आहे. शारीरिक व मानसिक तणावावर हास्य आरोग्यदायी आहे. मेंदूच्या, मणक्याच्या आजाराविषयी लोकांच्या मनात खुप गैरसमजुती आहेत. परंतु यातील बरेचसे आजार सुनियोजित काळजी घेतली, तर बरे होऊ शकतात. मेंदू आणि मणके यांचे नाते दृढ आहे. त्यामुळे मेंदूच्या व मणक्यांच्या आजारांविषयी लोकप्रबोधन व्हायला हवे,” असे मत प्रसिद्ध ब्रेन व स्पाईन सर्जन डॉ जयदेव पंचवाघ यांनी व्यक्त केले.
नवचैतन्य हास्ययोग परिवार, पुणे आणि सायनॅप्स ब्रेन अँड स्पाईन फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त ‘आरोग्याची गुरुकिल्ली : मेंदू आणि मणके’ या विषयावर डॉ. पंचवाघ यांची हास्ययोगतज्ज्ञ मकरंद टिल्लू यांनी मुलाखत घेतली. प्रसंगी नवचैतन्य हास्ययोग परिवारचे संस्थापक विठ्ठल काटे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
डॉ. पंचवाघ म्हणाले, ”मेंदूचा जसा शरीरावर, तसा शरीराचा मेंदूवर परिणाम होतो. उभा राहून चालण्याने, तसेच संगणकाशी निगडित काम असल्याने एकाच पोझमध्ये बसून काम करण्याने मणक्यावर ताण येतो व मणक्याचे आजार वाढतात. मज्जारज्जू, नसांवर ताण येतो. पण अनेकदा हा वयानुसार येणारा बदल असतो. प्रत्येक मणक्याच्या आजाराला शस्त्रक्रियेची गरज नसते. या आजारांमध्ये दहा टक्के लोकांनाच शस्त्रक्रियेची गरज असते. बाकीच्या वेळेस औषधांनी, व्यायामाने आजार बरे होऊ शकतात. मणक्याच्या शस्त्रक्रियेविषयी डॉक्टरांकडून योग्य रीतीने निर्णय घेणे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. मेंदूच्या व मणक्याच्या शस्त्रक्रियेबद्दल लोकांच्या मनात गैरसमजुती आहेत त्या दूर होणे आवश्यक आहे.” 
“अल्झायमर या आजाराचा सामना करताना मेंदू जितका सक्रिय ठेवाल, तेवढा चांगला आहे. हसणे हा मेंदूचा व्यायाम आहे. पण आपल्याकडे माणसे लाजून हसणे टाळतात.  पण हसणे हे माणूसपणाचे लक्षण आहे. हसण्यामुळे मेंदूतील अनेक केंद्रे उद्दीपित होऊन त्याचे कार्य चांगले होते. हसण्यासह वाचन, शारीरिक व्यायाम, कोड्यांची सोडवण, मित्र-नातेवाईकांचा संपर्क मेंदूला तल्लख ठेवतो. हास्यक्लब मुळे ज्येष्ठांना याबाबत फायदे होत आहे. हास्यक्लब वाढणे ही काळाची गरज आहे. समयसूचकता असणे हे प्रगल्भ बुद्धीचे लक्षण समजले जाते. मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी हसण्यासह शारीरिक हालचाली व्हाव्यात,” असेही डॉ. पंचवाघ म्हणाले.
मेंदूतील अनेक केंद्रांना संतुलित ठेव्यात हसण्याची क्रिया पूरक ठरते. मेंदूतील अनेक संप्रेरके माणक्याशी जोडलेले असतात. मणक्यांवर येणारा ताण मेंदूलाही जाणवतो. त्यामुळे चांगला आहार, नियमित व्यायाम, आनंदी-हसरे जीवन आपल्याला मेंदू-मणक्यांच्या आजारांपासून दूर ठेवते, असे त्यानी नमूद केले. मकरंद टिल्लू यांनी ऑनलाईन हास्यक्लबची माहिती दिली. विठ्ठल काटे यांनी प्रास्ताविक केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading