ग्रामीण भागातील शिक्षकांनी सक्षम, तंत्रस्नेही बनावे – अदिती तटकरे

रोहा : “विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका मोलाची असते. त्यामुळे त्यांना सक्षम आणि अद्ययावत होणे आवश्यक आहे. कोरोनाने सगळ्याच गोष्टी व्हर्च्युअल रूपात आणल्या आहेत. अशावेळी ग्रामीण भागातील शिक्षकांना नव्या माध्यमांशी जुळवून घेताना काही अडचणी येतात. कुठे इंटरनेटचा अभाव, तर अनेक विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन नसल्याने ऑनलाईन शिक्षण प्रभावीपणे देता येत नाही. त्यामुळे पायाभूत सुविधा सक्षम करण्यासह शिक्षकांना तंत्रस्नेही बनण्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे होते. सुदर्शनने या कामात पुढाकार घेतला, हे कौतुकास्पद आहे. यातून या शिक्षकांना निश्चितपणे दिशा मिळेल,” असे प्रतिपादन रायगडच्या पालकमंत्री, राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी केले.

कोरोनाच्या परिस्थितीत अध्यापन पद्धती बदलत असताना जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुदर्शन केमिकल्स इंडस्ट्रीज आणि सुदर्शन सीएसआर फौंडेशन व रायगड जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बदलते शालेय शिक्षणाचे स्वरूप व तंत्रज्ञान’ विषयावर आयोजित ऑनलाईन वेबिनारमध्ये अदिती तटकरे बोलत होत्या. यामध्ये प्रसिद्ध वक्ते आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे सहआयुक्त अनिल गुंजाळ, पुण्यातील सुपरमाईंड फाउंडेशनच्या संस्थापिका समुपदेशिका श्रीमती मंजुषा वैद्य यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. झूम मीटवर झालेल्या या वेबिनारला प्रमुख पाहुण्या म्हणून राज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, सुदर्शन केमिकल्स सामाजिक बांधिलकी व मानव संसाधन विभाग प्रमुख शिवालीका पाटील, संयोजिका माधुरी सणस आदी उपस्थित होते. साधारणपणे ४५०-५०० शिक्षक यामध्ये सहभागी झाले होते.

अनिल गुंजाळ म्हणाले, “शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांशी, पालकांशी संपर्क व संवाद ठेवावा. विद्यार्थी कोणत्या परिस्थितीत आहे, याची माहिती घ्यावी. सध्याची परिस्थिती नकारात्मक असली तरी त्यातून सकारात्मक होण्यासाठी प्रयत्न करावेत. विद्यार्थी शाळा पूर्वीसारखी होण्याची वाट बघत आहेत. पाठ्यपुस्तकेही परिपूर्ण असल्याने स्वयंअध्ययनातून शिक्षण घेता येऊ शकते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून लेखन, वाचन व गणनक्रिया पक्की करून घ्यावी. विद्यार्थ्यांना जातीवाद, भ्रष्टाचार, अंधश्रद्धा यापासून दूर ठेवत माणूस म्हणून जगायला शिकवावे. विद्यार्थ्यांना आनंदाने जगायला शिकवावे. तंत्रज्ञाचा वापर करत अथवा ‘टेकडी शाळे’सारखे वेगळे प्रयोग राबवत विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावे. त्यासाठी स्वतःही अध्ययन करावे.”

मंजुषा वैद्य म्हणाल्या, “कोरोनाने आपल्याला ऑनलाईनकडे जाण्यास भाग पाडले आहे. पण ही एक बदलाची नांदी असून, स्थित्यंतरासाठी पूरक आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी आहे. नव्या बदलांकडे, तंत्रज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टीकोन, क्षमता विकसन विद्यार्थी-शिक्षक या दोहोंसाठी महत्वाचे आहे. विद्यार्थी ज्ञानार्जनासाठी तंत्रज्ञानाचा सदुपयोग करताहेत. काही भागात अजूनही मोबाईल, नेटवर्क, इंटरनेट पोहोचण्यात अडचणी येताहेत, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, कृतिशील, ज्ञानरचनावादावर आधारित शिक्षणपद्धतीचा अंमल करण्यासाठी तंत्रज्ञान उपयुक्त आहे. आजच्या शिक्षकाला अध्ययन आणि अध्यापन अशा दोन्ही भूमिका वठवाव्या लागणार आहेत. विद्यार्थ्यांना सर्जनशील, चौकस घडवावे लागेल.”

किरण पाटील म्हणाले, “तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न शिक्षकांनी करावा. सर्वंकष आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी नवतंत्रज्ञान, कौशल्ये आत्मसात करावीत. छोटे मॉडेल्स, प्रकल्प, कार्यशाळा, नई तालीम यासारखे प्रयोग शिक्षकांनी करावेत. शिक्षकांचा तंत्रज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि त्यांच्यातील कौशल्य विकास साधण्याची आवश्यकता आहे. यामध्ये सुदर्शनने पुढाकार घ्यावा. प्रशासनाकडून त्यासाठी आवश्यक गोष्टींचे सहकार्य केले जाईल. ग्रामीण भागात तंत्रज्ञानाच्या काही अडचणी असल्याने शिक्षकांसमोर आव्हान असते. पण त्याला सामोरे जात आपण विद्यार्थी-शिक्षक संवाद वाढवण्यावर भर दिला पाहिजे.”

प्रास्ताविकात शिवालीका पाटील म्हणाल्या, “सुदर्शन केमिकल्स पिगमेंट्स क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर नामांकित कंपनी असून, सुधा सीएसआर फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्यात महिला सक्षमीकरण, पर्यावरण, शिक्षण आणि आरोग्य या चार घटकांचा समावेश आहे. त्याचाच भाग म्हणून ग्रामीण भागातील शिक्षकांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने हा कार्यक्रम आयोजिला आहे.” माधुरी सणस यांनी सूत्रसंचालन व समन्वयन केले.

विद्यार्थी-शिक्षक संवाद महत्वाचा
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या, तरी ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. विद्यार्थी आणि शिक्षक यांचा प्रत्यक्षात संवाद होत नाही. परंतु, शिक्षक शिकवत असलेले ज्ञान विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावे, यासाठी आजच्या बदलत्या तंत्रज्ञानाधारित शिक्षणातही या दोहोंमधील संवाद अतिशय महत्वाचा आहे, त्यातूनच विद्यार्थ्यांचे अध्ययन व शिक्षकांचे अध्यापन प्रभावी होईल.

– अनिल गुंजाळ, प्रसिद्ध वक्ते व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे सहआयुक्त

Leave a Reply

%d bloggers like this: