१५ ऑक्टोबरपासून ५० टक्के क्षमतेत चित्रपटगृहे सुरू होणार

नवी दिल्ली – लॉकडाऊनच्या सुरुवातीपासून बंद असलेली देशभरातील चित्रपटगृहे आता सुरू करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात आज पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यानुसार १५ ऑक्टोबरपासून ५० टक्के क्षमतेत चित्रपटगृहे सुरू करण्यास मान्यता दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटगृहांचे मालक आणि प्रेक्षकांना काही नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. त्याबाबत केंद्र सरकारने नियमावली जाहीर केली आहे. तर दुसरीकडे चित्रपटगृहे सुरू करण्याची परवानगी दिल्याने गेले सहा महिने बंद असलेल्या चित्रपटगृहांना आशेचा किरण दिसू लागला आहे.

महत्त्वाचे म्हणजे ‘चित्रपटापूर्वी करोना संदर्भात जनजागृती करणारी एका मिनिटांची शॉर्ट फिल्म अथवा एक घोषणा करणं अनिवार्य आहे. तसंच ऑनलाइन तिकिट आरक्षित करण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे’, अशी माहिती जावडेकर यांनी दिली.

दरम्यान, चित्रपटगृहे बंद असल्याने बॉलिवूडचे अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र, मर्यादित प्रेक्षकसंख्येचा विचार करता संबंधित निर्माते आणि दिग्दर्शक सध्याच्या घडीला आपले चित्रपट प्रदर्शित करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. याशिवाय, मर्यादित प्रेक्षकसंख्येमुळे मल्टिप्लेक्सेसकडून तिकिटांच्या दरात वाढ केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता चित्रपटगृहे सुरु झाल्यानंतर प्रेक्षक या सगळ्याला कशाप्रकारे प्रतिसाद देणार, यावरच पुढील समीकरणे अवलंबून असतील.

चित्रपटगृहात जाण्याआधी हे वाचा
चित्रपटगृहातील प्रत्येक व्यक्तीला मास्क परिधान करणे बंधनकारक आहे.
चित्रपटगृहात हात धुण्यासाठी आणि हँड सॅनिटायझर्सची व्यवस्था असणे अनिवार्य असेल.
चित्रपटगृहात येण्यापूर्वी प्रेक्षकांचे थर्मल स्कॅनिंग करावे. कोरोनाची लक्षणे नसलेल्या प्रेक्षकांनाच आतमध्ये प्रवेश द्यावा.
चित्रपट सुरू होण्यापूर्वी एका मिनिटांची शॉर्ट फिल्म जनजागृतीसाठी दाखवणे बंधनकारक असेल.
सोशल डिस्टन्सिंग पाळले जावे.
ज्या जागी प्रेक्षकांना बसता येणार नाही त्या आसनांवर खुणा केलेल्या असाव्यात.
प्रेक्षकांना आरोग्य सेतू ऍपचा वापर करण्याचा सल्ला द्यावा.
मध्यांतरामध्ये प्रेक्षकांनी इतरत्र जाणे टाळावे.
सातत्याने साफसफाई आणि सॅनिटायझेशन केले जावे.
आवश्यकता भासल्यास कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी प्रेक्षकांचे फोन क्रमांक घ्यावे.
प्रेक्षकांना आवश्यकता असल्यास पॅकेज फूड देण्यात यावे.

Leave a Reply

%d bloggers like this: