अपयश झाकण्यासाठीच सरकारकडून मुद्द्यांना बगल; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची टीका

पुणे : “बिहारमधील राजकीय घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यापेक्षा, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे. हाथरससारख्या घटना महाराष्ट्रातही घडल्या आहेत. मात्र, अनिल देशमुख त्यावर चकार शब्द काढत नाहीत. कोरोना, कायदा व सुव्यवस्था, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आदी प्रश्न राज्यासमोर आहेत. ते सोडवण्यात अपयश येत असल्यानेच जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी अनिल देशमुख अशी विधाने करत आहेत,” अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते.

प्रवीण दरेकर म्हणाले, “सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी ‘अजून बाळंतीण झाली नाही आणि हे नाव ठेवून मोकळे’ असे झाले आहे. गृहमंत्री अनिल देशमुखांना निष्कर्षावर येण्याची प्रचंड घाई झाली आहे. भाजपने कधीच सुशांत सिंगने आत्महत्या केली की हत्या झाली हे विचारले नव्हते. एम्सचा बाबतीत जो रिपोर्ट येईल तो आम्ही स्वीकारणारच आहोत. आणि अद्याप सीबीआय रिपोर्ट जाहीर होणे बाकी आहे. त्यामुळे अनिल देशमुखांनी घाई करू नये.”

महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वर पांडे यांचा प्रचार देवेंद्र फडणवीस करणार का? असा सवाल अनिल देशमुख यांनी केला होता. त्यावर उत्तर देताना दरेकर म्हणाले, “गुप्तेश्वर पांडे हे भारताचे नागरिक आहेत. त्यांना निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. त्यांना भाजपने उमेदवारी दिलेली नाही किंवा ते भाजपमध्येही आलेले नाहीत. कामाची जनता दलाशी आधीच युती आहे. त्यामुळे प्रभारी म्हणून देवेंद्र फडणवीस युतीचा प्रचार करतील. त्यामुळे उगाचच राज्यातील मंत्र्यांनी बिहारमध्ये काय होतेय, यावर लक्ष देऊ नये. राज्यात कोरोनाची स्थिती भयंकर आहे. ती नीट हाताळता येत नाही. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहिला आहे. महाराष्ट्रात रोज कुठेतरी हाथरससारखी घटना घडत आहे. त्यावर लक्ष देण्याऐवजी गृहमंत्री नको त्या विषयावर भाष्य करत आपले अपयश लपविण्याचा प्रयत्न करताहेत. गृहमंत्री पदाची गरिमा कायम राहण्यासाठी त्यांनी गांभीर्याने विचार करायला हवा. मुंबई पोलीस हे केवळ सरकारचे नाहीत, तर आमचेही आहेत. त्यामुळे त्यांनी राज्याच्या गृहमंत्र्यासारखे वागावे. एकाच पक्षाचे नेते अशा भावनेतून वागू नये.”

राज्यात एक प्रकारची अराजकता माजली आहे, हे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या व्हायरल झालेल्या क्लिपवरून दिसते. मराठा आरक्षणाचा प्रश्न विचारल्याने सत्तारांनी युवकाला आई-बहिनीवरून शिव्या देत दमदाटी केली आहे. महाराष्ट्राच्या परंपरेला हे शोभणारे नाही. त्यामुळे या क्लिपचे चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी व अटक करावी, अशी स्पष्ट सूचना दरेकर यांनी केली.

Leave a Reply

%d bloggers like this: