fbpx
Monday, June 17, 2024
MAHARASHTRA

नागपुरसाठी बुध्दिस्ट थीम पार्कचा आराखडा करा – डॉ.नितीन राऊत

नागपूर, दि. १८ : देशाच्या मध्यभागी आणि विकासाच्या दृष्टीकोनातून अत्यंत सोयीचे असलेल्या नागपूरचा कायापालट करून कोराडी येथे ऊर्जा शैक्षणिक पार्क, भव्य हनुमान मूर्ती स्मारक, सेल्फी पॉइंट, तलाव सौंदर्यीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. सोबतच, फुटाळा तलाव येथे बुध्दिस्ट थीम पार्क, यशवंत स्टेडियम परिसरात जागतिक दर्जाचे अत्याधुनिक नवीन स्टेडियम, वाहन विरहीत बिझनेस सेंटरचा आराखडा देश-विदेशातील पर्यटक आणि नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरेल, असा तयार करावा, असे निर्देश पालकमंत्री तथा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत दिले.

या बैठकीला केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, गृहमंत्री अनिल देशमुख, खासदार कृपाल तुमाने, आमदार विकास ठाकरे, प्रकाश गजभिये, विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, विकास प्राधिकरणाच्या आयुक्त शीतल उगले व मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर उपस्थित होते.

नागपूर हे उपराजधानीचे शहर आहे. नागपूरला समुद्र नाही. मात्र ती उणीव भरून काढणारे नैसर्गिक तलाव, घनदाट जंगल, हिल्स, डोंगर आणि नद्या आहेत. त्यांची पर्यटनाशी सांगड घालण्याचा प्रयत्न आहे, असे पालकमंत्री म्हणाले. नागपूर उपराजधानीच्या दर्जानुसार विकसित व्हावी, हे ध्येय समोर आहे.

हा विकासाचा आराखडा किमान 10 वर्षाचा राहिल. निर्धारित कामे तीन टप्प्यात पूर्ण केले जातील. मेट्रोसह सुलभ व जलद वाहतूक, शहरातून वाहणाऱ्या नद्या प्रदूषणमुक्त करणे. त्यांच्या परिसराचे सौदर्यीकरण करणे. अद्ययावत सिटी बनविणे. योगायोगाने नागपुरात भरपूर मोकळ्या जागा आहेत. अनेक हिल्स आहेत. केंद्रीय कार्यालयांमध्ये खुल्या जागा अधिक आहेत. त्या जागांवर वैशिष्‍ट्येपूर्ण झाडे लावण्यात येतील. या कामात लोकांचा व कर्मचाऱ्यांचा जास्तीत जास्त सहभाग वाढविला जाईल.

देशातील पथदर्शी “ऊर्जा शैक्षणिक पार्क” कोराडीत साकारणार. जागतिक दर्जाचे बुद्धिस्ट थीम पार्क फुटाळा भागात होईल. बिझनेस सेंटर आणि न्यू स्टेडियम यशवंत स्टेडियम परिसरात होईल. हे जागतिक दर्जाचे अत्याधुनिक नवीन स्टेडियम असेल. वाहन विरहीत बिझनेस सेंटर हे देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण ठरेल.

राज्याच्या अर्थसंकल्पात कोराडी येथे “ऊर्जा पार्क” प्रकल्पांची घोषणा केली. त्यानुसार, जमीन, पाणी आणि मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध असल्याने नागपूर जवळच्या कोराडी येथे ऊर्जेचे विविध स्त्रोत आणि त्याचा मानवी जीवनाला होणारा उपयोग लक्षात घेऊन शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना यातून हसत-खेळत शिक्षण मिळावे, त्यांना ऊर्जेचे स्त्रोत प्रत्यक्ष प्रकल्प स्थळी हाताळता यावे, सोबतच मनोरंजन व्हावे आणि पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा या ऊर्जा पार्क उभारण्यामागचा उद्देश असल्याचे पालकमंत्री म्हणाले.

फुटाळा तलाव येथे जागतिक दर्जाचे बुध्दिस्ट थीम पार्क आणि नागपूर शहरातील यशवंत स्टेडियम येथे नवीन स्टेडियम आणि बिझनेस सेंटर उभारण्याचे प्रस्तावित आहे. या सर्व प्रकल्पांचे लवकरच मुख्यमंत्री महोदयांकडे सादरीकरण करण्यात येईल, असेही पालकमंत्री श्री. राऊत यांनी सांगितले. या महत्त्वाच्या विकास कामांचा आराखडा प्राथमिक अवस्थेत असून निधीची तरतूद करून सदर प्रकल्प साकारण्याचा मानस डॉ. राऊत यांनी व्यक्त केला. यासोबतच नागभवन, जिल्हाधिकारी कार्यालय, डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहाचा पुनर्विकास यासह एस.टी. बस स्थानकाजवळील फुल बाजाराच्या विकासाचे सादरीकरण वास्तुविशारद अशोक मोखा यांनी केले. शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाला मदत व फुले निर्यात करण्यासाठी फुलबाजार परिसराच्या विकास आराखड्याला गती देण्याची सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

केंद्र सरकार वाराणशीचा विकास पर्यटनाच्या दृष्टीने करीत असून या ठिकाणी बुध्दिस्ट सर्कीट तयार करण्यात येत असल्याचे गडकरी यांनी सांगितले. तसेच दरवर्षी विधिमंडळाचे होणारे हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागभवन, रविभवन-देशपांडे सभागृह, आमदार निवास यांच्या एकत्रित विकास आराखड्यांबाबत मुख्यमंत्री महोदयांचे मार्गदर्शन घेण्याची सूचना त्यांनी केली. नागपूर येथील बुध्दिस्ट थीम पार्क वाराणशी बुध्दिस्ट सर्कीटशी जोडण्यात यावे व केंद्र सरकारने यासाठी काही प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा, असे पालकमंत्री म्हणाले. गृहमत्री अनिल देशमुख, खासदार कृपाल तुमाने, आमदार प्रकाश गजभिये व विकास ठाकरे यांनी विविध सूचना मांडल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading