fbpx
Monday, June 17, 2024
MAHARASHTRA

कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण पाच तासात निगेटीव्ह, धारावी पॅटर्न राबवा – राजेंद्र पातोडे

अकोला दि. १२ – अकोला जिल्ह्यात कोरोना रुग्ण व मृत्यूचे प्रमाण वेगाने वाढत आहे. हे थांबविण्यासाठी मास्क न घालणाऱ्या नागरिकांना दंड आकारणे, वाहने जप्त करणे आणि रुग्णाची माहिती लपविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे, तसेच लॉकडाऊन सारख्या इतर उपाययोजनान ही राबविण्यात येत आहेत.तथापि रुग्ण तपासणी करीता प्राप्त झालेल्या रॅपिड टेस्ट मध्ये पॉझिटीव्ह आलेले रुग्ण अवघ्या पाच तासात निगेटीव्ह येत असल्याने जिल्ह्यात पॉझीटीव्ह म्हणून जाहीर केलेले रुग्ण खरेच पॉझीटीव्ह आहेत का ? अशी शंका निर्माण करणारे दोन प्रकरणे उघडकीस आल्याने हा सावळा गोंधळ काय आहे ? याचा खुलासा जिल्हा प्रशासनाने करावा तसेच कोरोना मुक्तीचा धारावी पॅटर्न अकोल्यात राबवावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी केली आहे.

अकोला जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने अकोला जिल्ह्यासाठी ही धोक्याची घंटा ठरत आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तपासणी न करता बाहेर गावी जात असलेल्या नागरिकांना वैधकीय प्रमाणपत्र देण्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला होता. संशयित कोरोना रुग्ण असलेल्या तरुणीचे केस पेपर फोटोसह सार्वजनिक करण्यात आले होते. कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या अंतयात्रेत मोठ्या संख्येने लोक सहभागी झाल्याची प्रकरणे उघडकीस आली. मात्र कुठल्याही प्रकरणात जिल्हा प्रशासनाने गुन्हे नोंदविले नाही किंवा कारवाई केली नाही. अगदी काल परवा अकोट तालुक्यात कावसा आणि अकोली जहांगीर येथे सापलेल्या दोन रुग्णांचे रॅपिड टेस्ट अहवाल स्वाब टेस्ट मध्ये निगेटीव्ह आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
अकोली जहांगीर येथील रुग्ण हा पॉझिटीव्ह जाहीर करून त्यास शासकीय वैधकीय महाविद्यालयात दाखल करून घेण्यात आले होते. त्यांच्या नातेवाईकांना देखील पाटसूळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहात विलगीकरणात ठेवण्यात आले. परंतु अवघ्या पाच तासात झालेल्या दुस-या तपासणीत हा रुग्ण निगेटीव्ह जाहीर करण्यात आला. त्यास त्याचे नातेवाईकांनी आझोन खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.

असाच दुसरा प्रकार कावसा येथे उघडकीस आला.रॅपिड टेस्ट किट मधील तपासणीत एक रुग्ण पॉझीटीव्ह असल्याचे जाहीर करून त्यास अकोला येथे हलविण्यात आले.त्याचे कुटुंब विलगीकरण करणे आणि परिसर सील करण्याची कार्यवाई सुरु झाली.दुस-या दिवशी त्याचा स्वाब नमुना घेण्यात आला व तिसऱ्याच दिवशी हा रुग्ण निगेटीव्ह असल्याचे जाहीर करण्यात आले. या पॉझीटीव्ह, निगेटीव्ह प्रकारामुळे अकोला जिल्ह्यातील पॉझीटीव्ह रुग्ण म्हणून उपचार सुरु असलेले रुग्ण खरोखर पॉझीटीव्ह आहेत की निगेटीव्ह हा संशय निर्माण होत असल्याचे एकंदर चित्र आहे. रॅपिड टेस्ट किट सदोष आहेत की स्वाब टेस्ट करणारी यंत्रणा याचा खुलासा जिल्हा प्रशासनाने तातडीने करावा अशी मागणी वंचितने केली आहे.

अकोल्यात वाढती रुग्ण संख्या आणि मृत्यू दर हा थांबवण्यासाठी प्रशासनाने अघोरी उपाय योजना राबविणे बंद करून जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केलेला ‘धारावी पॅटर्न’ अकोल्यात राबविण्यात यावा.अडीच चौरस मिटर क्षेत्रात साडे आठ लाख लोकवस्ती असलेल्या एशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीत आहे. तेथील पालिका आयुक्त इकबालसिंग चहल यांनी ‘चेसिंग द वायरस’ ही मोहीम राबविली आहे. दहा बाय दहाची घरे आणि ऐंशी टक्के नागरिक कॉमन शौचालय वापरत आहेत. अश्या दाट वस्तीत ‘फिजिकल डिस्टंसिंग’ शक्य नसल्याने संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले. तब्बल ३.६ लाख नागरिकांची विक्रमी तपासणी करण्यात आली तर १४,९७० नागरिकांची मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून तपासणी केली गेली. त्यामुळे मुंबईतील कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या धारावी मध्ये आज रोजी केवळ १२२ सक्रिय रुग्ण आहेत. २००२ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. धारावी पॅटर्नचे कौतुक जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. घेब्रेयेसेस यांनी केले आहे.अकोला जिल्हा प्रशासन, शासकीय महाविद्यालय प्रशासन आणि मनपा प्रशासनाने देखील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी धारावी सारखा यशस्वी पॅटर्न अकोल्यात राबवावा,मात्र अकोल्यात नवनवीन जालीम उपाय करून नागरिकांच्या जीविताशी खेळू नये अशी अपेक्षा देखील राजेंद्र पातोडे यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading