fbpx
Monday, June 17, 2024
ENTERTAINMENT

ऐश्वर्या आणि आराध्या बच्चन सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई, दि. 12 – अमिताभ, अभिषेक यांच्यापाठोपाठ अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. अभिषेक-ऐश्वर्या यांची कन्या आराध्या बच्चन यांनाही संसर्ग झाला आहे. दोघींनाही नानावटी रुग्णालयात नेले जाण्याची शक्यता आहे.

बिग बी यांच्या पत्नी, अभिनेत्री जया बच्चन, त्यांची कन्या श्वेता बच्चन-नंदा, नात नव्यानवेली नंदा, नातू अगस्त्य नंदाही यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत महानायक अमिताभ बच्चन आणि पुत्र अभिनेता अभिषेक बच्चन या दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. बच्चन पिता-पुत्रांनी स्वत: ट्विट करत याबाबत रात्री उशिरा माहिती दिली.

अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची सौम्य लक्षण आहेत. त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहे. बच्चन पिता-पुत्रांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल आता समोर आला असून ऐश्वर्या राय बच्चन आणि त्यांची मुलगी आराध्या बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे.

अभिषेक बच्चन यांचे ट्विट

“माझ्या आणि माझ्या वडिलांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आमच्या दोघांमध्येही कोरोनाची सौम्य लक्षण आहेत.सध्या रुग्णालयात आमच्यावर उपचार सुरु आहेत,” अशी माहिती ट्विट करत अभिषेक बच्चन यांनी दिली

अमिताभ बच्चन यांचे ट्विट

“माझा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच माझ्या कुटुंबाला आणि घरातील इतर स्टाफच्याही कोरोना चाचण्या झाल्या आहेत. त्यांच्या चाचणीचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही,” असे ट्विट अमिताभ बच्चन यांनी केले आहे.

“तसेच गेल्या दहा दिवसात माझ्या संपर्कात जे व्यक्ती आले त्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करावी,” असेही बिग बींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

अमिताभ बच्चन यांचा बंगला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

अमिताभ बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आज सकाळी मुंबई महापालिकेचे अधिकारी बच्चन यांच्या निवासस्थानी ‘जलसा’ बंगल्यावर दाखल झाले. ‘जलसा’ बंगला पूर्णपणे सॅनिटाईज करण्यात आला. याशिवाय अमिताभ यांचा ‘जलसा’ आणि ‘जानकी’ बंगला दररोज सॅनिटाईज केला जाणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दरम्यान, अमिताभ बच्चन यांचा बंगला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. बंगल्याच्याबाहेर मोठे फलक लावून पोलिसांनी बॅरिकेट्स लावले आहेत. जलसामधील परिस्थिती चांगली असून सर्वांचं काऊंसिलिंग करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त विश्वास मोटे यांनी दिली. तर बंगल्यातील सर्व कर्मचाऱ्यांना तिथेच क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

दरम्यान, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या या सर्वांनी बच्चन कुटुंबियांना लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आणि सदिच्छा दिल्या. गृहमंत्री अनिल देशमुख “शहंशाह” कोरोनाची “दिवार” तोडून “अग्निपथावर” मात करतील आणि आपल्या सर्वांना आनंद देतील अशी सदिच्छा व्यक्त केली आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील ट्विट करत अमिताभ बच्चन यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली. ते म्हणाले, “महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन या दोघांनी त्यांना असलेल्या लक्षणांच्या आधारे कोरोना चाचणी केली. या चाचणीचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. ते दोघेही नानावटी रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना काही सौम्य लक्षणं आहेत.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading