Sunday, June 21, 2026
PUNE

लॉकडाऊनने प्रश्न सुटणार नाहीत ; जीवनपद्धतीत बदल करुन कोरोनासोबत जगायला शिका – आयुक्त शेखर गायकवाड

पुणे, दि. 30 – आपल्या डोळ्यांना न दिसणारा आणि कोणालाही होईल अशा कोरोनाच्या प्रार्दुभावामध्ये आपण जगत आहोत. त्यात पावसाळा सुरु झाल्याने इतर आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे हा लढा आपल्याला अहोरात्र सुरु ठेवायचा असून पुण्यातील ओंकारेश्वर सारखी देवस्थाने, सामाजिक संस्था व प्रशासनाचे सहकार्य असल्याने ही व्यवस्था टिकून आहे. केवळ लॉकडाऊनने प्रश्न सुटणार नाहीत, आपण कोरोनासोबत जगायला शिकले पाहिजे, असे मत पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केले.

श्री ओंकारेश्वर देवस्थान पुणे आणि खासदार गिरीश बापट यांच्यावतीने कोरोना बाधितांना जेवण व विडी कामगार, घरेलु कामगार, रिक्षाचालक, बारा बलुतेदारांना अन्नधान किट देण्याच्या कार्यात सहभागी समाजसेवी कार्यकर्त्यांचा सन्मान मंदिराच्या आवारात करण्यात आला. यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम्, मुख्य आयोजक देवस्थानचे अध्यक्ष खासदार गिरीश बापट, प्रमुख विश्वस्त धनोत्तम लोणकर, स्वरदा बापट आदी उपस्थित होते.
शेखर गायकवाड म्हणाले, पुण्यामध्ये सन १८९६ साली प्लेगची साथ आली होती, त्याचा प्रार्दुभाव सन १९१२ पर्यंत राहिला होता. त्यावेळी सुमारे २ लाखांनी लोकसंख्या कमी झाली होती. आज २०२० मध्ये देखील कोरोनाच्या विरोधात प्रखर लढा सुरु आहे. गरजूंसाठी महापालिकेने शेल्टर कँम्प केले, त्यामध्ये जेवणासह इतर सुविधा देण्याकरीता स्वयंसेवी संस्था पुढे आल्या, हा समाजातील चांगुलपणा आहे. किमान १ वर्ष तरी आपण काळजी घेत आपल्या जीवनपद्धतीत बदल करावे, असेही त्यांनी सांगितले.
के.व्यंकटेशम म्हणाले, लॉकडाऊनच्या काळात पुणेकरांनी मोठी साथ दिली. पोलीस व मनपा प्रशासनाला यामुळे चांगले काम करणे शक्य झाले. सामाजिक संस्थांनी याकाळात दिलेली साथ देखील मोलाची आहे.
खासदार गिरीश बापट म्हणाले, समाजापुढे कोरोनासारखे मोठे संकट आले आहे. त्यामुळे आम्ही सुमारे १० हजार गरजू लोकांपर्यंत जेवणाची व अन्नधान्याच्या किट सोय लॉकडाऊनच्या काळात केली. माझ्या खासदार मानधनातून देखील मदतीचा हात दिला. त्यासोबतच पोलीस, मनपा आणि ओंकारेश्वर देवस्थान, निनाद पुणे सारख्या संस्था कोणताही मोबदला न घेता मदतीला पुढे आल्या. सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून सुरु असलेली ही मदत केवळ सहभागी कार्यकर्त्यांमुळेच शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading