महिला कॉन्स्टेबलच्या हस्ते पोलिसांसाठीच्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन
बुलडाणा, दि.25 : जिल्हा पोलीस दलाच्या वतीने कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांच्या तातडीच्या वैद्यकीय औषधोपचारासाठी स्व. दिपक जोग स्मृती भवन येथे कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले आहे. या सेंटरचे उद्घाटन आज जानेफळ पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस कॉन्स्टेबल पूजा राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी आमदार संजय गायकवाड, वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, अप्पर पोलीस अधिक्षक संदीप पखाले, पोलीस उपअधिक्षक (गृह) बळीराम गिते आदींची उपस्थिती होती.
तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातील एनआयसी येथे व्हिसीच्या माध्यमातून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांच्याशी संवाद साधला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी कोविड केअर सेंटरविषयी माहिती दिली. सेंटरचे चित्रीकरणही यावेळी दाखविण्यात आले. दरम्यान, गृहमंत्री यांनी पॉस्को अंतर्गत दाखल असलेल्या केसमध्ये दोन वेळा अकोला सामान्य रूग्णालयात जाऊन आलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबल पूजा राजपूत यांच्याविषयी चौकशी केली. त्यांच्या धाडसाचे त्यांनी कौतुक केले. त्यांच्याच हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्याच्या सूचना देत त्यांच्यासमोर त्यांनी ऑनलाईन उद्घाटन करायला लावले. त्यानुसार महिला कॉन्स्टेबल पूजा राजपूत यांच्या हस्ते कोविड केअर सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.
त्यानंतर रविकांत तुपकर यांच्या हस्ते कोविड केअर सेंटरच्या पलीकडील भागात असलेल्या उपहारगृहाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच कोविड केअर सेंटरसाठी घेण्यात आलेल्या विंधन विहीरीच्या पाण्याचे जलपूजनही करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.