fbpx

दहावी, बारावीचा 20 टक्के अभ्यासक्रम कमी होणार

मुंबई, दि. 25 – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ऑनलाईन शिक्षण सुरू केले असले, तरी शाळा कधी सुरू होणार, याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. यामुळे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सुमारे 20 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. याबाबतचा निर्णय दोन दिवसांत घेण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.

कोरोना महामारीमुळे राज्यातील शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ऑनलाईन वर्ग सुरू झाले आहेत. आगामी शैक्षणिक वर्षात शालेय अभ्यासक्रम आणि शाळांमधील तासिकांत कपात करण्याची सूचना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी केली होती. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही तसे संकेत दिले होते.

राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) व केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ यांना जूनमध्ये दहावी आणि बारावीचे अभ्यासक्रम कमी करण्याच्या निर्णय घेतला आहे. त्यानुसार अभ्यासक्रमात समान आशय असलेला भाग रद्द करावा, असा प्रस्ताव शिक्षणतज्ज्ञांनी सरकारसमोर मांडला आहे. त्यानुसार अभ्यासक्रमात कपात करून नवीन शैक्षणिक सत्रातील (2020-21) अभ्यासक्रम तयार केला जाणार आहे.

केंद्राप्रमाणेच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने तयारी सुरू केली आहे. विविध विषयांच्या अभ्यास मंडळ सदस्यांना अभ्यासक्रम कपात करून देण्यास सांगितले आहे. त्यानुसार अनेक अभ्यास मंडळांनी आपले अहवाल परिषदेकडे सुपूर्द केले आहेत. दहावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमांत 20 ते 25 टक्के कपात होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

गणित, विज्ञान, भाषा या विषयांसाठी अभ्यासक्रम आणि तासिका कपातीचे वेगवेगळे निकष लागू करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. बारावीचा विज्ञान विषयाचा अभ्यासक्रम कमी करताना केंद्रीय परीक्षा डोळ्यासमोर ठेवून विचार करण्यात येणार आहे. दहावीचा अभ्यासक्रम कमी करताना विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी उपयुक्त गणित आणि विज्ञानातील पाठ कायम ठेवल्याचे समजते. याबाबतचा अंतिम निर्णय दोन-तीन दिवसांत येण्याची शक्‍यता आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: