fbpx
Monday, October 2, 2023
MAHARASHTRA

वीजग्राहकांची प्रचंड लूट, सुलभ हप्त्यांच्या सवलतीचे गाजर – राजेंद्र पातोडे

मुंबई, दि. २४ – लॉकडाऊनच्या कालावधीनंतर मीटर रिडींग न घेता सरसकट तींन महिन्याचे वीजबिल ग्राहकांना देऊन त्यांची लूट करण्यात येत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी केला आहे. या वीजबिलाची रक्कम भरण्यासाठी सुलभ हप्ते करून देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली. तथापि ही सवलत नसून शासकीय लूटीला राजाश्रय दिला जात असल्याचे ही त्यांनी सांगितले.

लॉकडाऊनच्या कालावधीत वीज ग्राहकांची मीटर रिडींग घेण्यात आली नाही. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात ग्राहकांना सरासरी वीज वापरानुसार बिल देण्यात आले. मार्चनंतर प्रथमच थेट जूनमध्ये मीटर रिडींग घेण्यात आले. त्यामुळे मार्च ते जून पर्यंतचे रिडींग घेऊन एकूण वीजवापराचे एकत्रित बिल ग्राहकांना देण्यात आले. हे सरासरी बील आकारताना एकूण तीन महिन्याचे बिल एकत्र केल्याने युनिट पाचशेच्यावर जाताच त्याच्या दरात मोठी वाढ करण्यात येत आहे. गृहीत धरा की तीन महिन्याचे सरासरी बिल हे ६६४ युनिट असेल तर त्याला ११. ७१ प्रमाणे आकार लागेल व त्याचे तीन महिन्याचे बिल हे ७७७५ इतके होईल. शिवाय त्या मध्ये इतर चार्ज समाविष्ट केल्यास ती रक्कम ८४०० इतकी होईल. हेच बिल दरमहा आकारले तर ६६४ भागीले तीन महीने केले असता दरमहा २२१.३३ इतका वीज वापर होतो. त्याचा वीज दर २२१.३३ x ७. ५० पैसे केला तर हे बिल १६५९. ७५ होईल व दरमहा १६५९.९७ प्रमाणे वीज बिल असल्यास तीन महिन्याचे ४९७९.९२ इतके वीज बिल येईल. परंतु महावितरणने हे सरासरी बिल देताना ८४०० इतके दिले आहे. कारण एकत्रित बिलामुळे वीज आकारात वाढ झाली आहे. वीज बिल आकारणी करताना घरगुती वीज ग्राहकास १०० युनिट पर्यंतचा दर हा २,५७ पैसे अधिक इंधन समायोजन आकार घेतला जातो. १०० ते ३०० युनिट पुढे ४,५५ पैसे अधिक इंधन समायोजन आकार लावला जातो.३०० ते ५०० युनिटचा ६,५१ पैसे तर ५०१ ते १००० युनिट पर्यंत ७,५५ पैसे आणि १००० युनिट पुढे हा आकार ७,८१ पैसे आहे.
ही दर आकारणी पाहता दरमहा १०० ते ३०० युनिट साठी ४,५५ पैसे अधिक इंधन समायोजन आकार असलेल्या ग्राहकांना सरासरी बिलामूळे ५०० युनिट पेक्षा अधिकचा ७,५५ पैसे दर लावण्यात आला आहे. त्यामुळे वीज बिलात जवळ जवळ दुप्पटीने वाढ झाली आहे. हा ग्राहकाच्या खिश्यावर टाकलेला सरकारी दरोडा आहे. ही महावितरणची मनमानी असल्याचे राजेंद्र पातोडे यांनी सांगितले.
एक महिन्यापेक्षा अधिक कालावधीचे वीजबिल असल्याने स्लॅब बेनिफिट देण्याचे तसेच ग्राहकांनी एप्रिल व मे मध्ये सरासरी वीजबिलांची रक्कम भरली असल्यास त्या रकमेचे समायोजन करण्यात येईल, चुकीच्या बिलाची दुरुस्तीसाठी तत्परतेने कार्यवाही करण्यात यावी व ग्राहकांना चुकीच्या वीजबिलांचा कोणताही त्रास होऊ नये, अशा सूचना महावितरणला देण्यात आल्याचे ऊर्जामंत्री डॉ. राऊत सांगितले.परंतु वीज बिल न भरता ही दुरुस्ती होणार नाही. त्यामुळे दिलेल्या रकमेच्या अवाजवी वीज बिलाचा भरणा ग्राहकाला करावा लागेल. सोबतच बिल कमी करण्यासाठी किंवा दुरुस्त्यासाठी वीज कार्यालयाच्या फे-या माराव्या लागतील.
महावितरणच्या ग्राहकांवर वीजबिलांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा भुर्दंड लादलेला नाही, असे ऊर्जामंत्री सांगत असले तरी जूनमध्ये देण्यात येत असलेली वीज बिले ही लॉकडाऊनच्या कालावधीत ग्राहकांनी वापरलेल्या सरासरी युनिट प्रमाणे दिले आहे. त्यामध्ये ग्राहकांना लुटण्यात येत आहे.सबब वीज ग्राहकांनी ही अवास्तव वीज बिलाचा भरणा करू नये. https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकवर जाऊन आपल्या रीडिंगची तपासणी करावी व सरासरी बिल न घेता दरमहा बिल (तीन स्वतंत्र बिल) घेऊनच वीज बिलाचा भरणा करावा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीने केले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: