fbpx
Thursday, September 28, 2023
NATIONAL

पुन्हा लॉकडाऊन; वाढत्या रुग्णसंख्ये मुळे काही राज्यांचा निर्णय

मागील 24 तासात देशात 15 हजार 968 नवीन रुग्ण तर 465 मृत्यू

नवी दिल्ली, दि. 24 – कोरोनामुळे देशात तब्बल अडीच महिन्यांचा कडक लॉकडाऊन पाळण्यात आला. त्यानंतर, केंद्र आणि राज्य सरकारने अनलॉक करत परिस्थिती पूर्वपदावर आणण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अनलॉक 1 मध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. सध्या देशातील एकूण रुग्णांची संख्या साधारणपणे 4.5 लाखांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा देशातील काही राज्यांनी लॉगडॉउन लागू केले आहे.

चेन्नई येथे 19 ते 30 जूनपर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे गुवाहटी येथेही मंगळवार 23 जूनपासून 14 दिवसांसाठी लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. आता, बंगळुरु येथेही कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, लॉकडाउन लागू करण्यावर विचारविनिमय सुरू आहे.देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत मुंबई अव्वलस्थानावर असून इथे रुग्णांची संख्या 67 हजारांवर पोहोचली आहे. त्यामुळे, मुंबईतही पुन्हा लॉकडाउन लागू केला जाण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही.

तामिळनाडूत कोरोनाचा गुणाकार होताना दिसत आहे, त्यात चेन्नई येथे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे, मेट्रोपोलियन सिटी असलेल्या चेन्नईतील जिल्ह्यात 19 ते 30 जूनपर्यंत लॉकडाउन लागू झाला आहे. चेन्नई, कांचीपूरम, चेंगलपट्टू, आणि तीरवल्लर या शहरात हा लॉकडाउन असून यास ‘मैक्सिमाइज रेस्ट्रिक्टेड लॉकडाउन’ असे नाव देण्यात आले आहे. चेन्नईत कोरोनाचे एकूण 44,205 रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात 1380 नवीन रुग्णांची भर पडली आहे.

आसाममध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, पुन्हा एकदा लॉकडाउनची चर्चा सुरु आहे. गुवाहटीच्या 11 नगरपालिका क्षेत्रात मंगळवारपासूनच 14 दिवसांसाठी लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. आसाममध्ये आत्तापर्यंत 3718 एकूण रुग्ण आढळले असून त्यापैकी 1584 लोकं बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, खबरदारी म्हणून सरकारकडून लॉकडाउन करण्यात आले आहे. दरम्यान, बंगळुरुतही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री येदीयुरप्पा यांनी, ज्या भागात रुग्णांची वाढ होतेय, तेथे लॉकडाउन कडक करण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, देशातील एकूण रुग्णसंख्या आत्तापर्यंत 4 लाख 56 हजार वर पोहोचली असून त्यामध्ये 1,78,014 एक्टीव्ह रुग्ण आहेत. तर जवळपास अडीच लाखा हुन अधिक रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. दरम्यान, कोरोनामुळे देशात 14,474जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: