fbpx
Monday, September 25, 2023
MAHARASHTRA

आंबडवे गावाला वंचित बहुजन आघाडीची मदत!

प्रकाश आंबेडकरांची गावाला भेट

मुंबई, दि. २४ – भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ गाव म्हणजेच आंबडवे, हे गाव मंडणगड तालुक्यातील रत्नागिरी जिल्ह्यात आहे. ऐतिहासिक असलेल्या या गावची परिस्थिती आज खूप वाईट आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले असल्याने आज या गावकऱ्यांना मोठया प्रमाणावर मदतीची गरज आहे. मागासवर्गीयांची मते व सहानुभूती मिळविण्यासाठी आंबडवे हे गाव अनेक राजकीय नेत्यांनी दत्तक घेतले. मात्र दत्तक घेणाऱ्यांचे काम आणि मदत शून्य असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यात निसर्ग या चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीवर धडक दिली. त्यामुळे कोकण किनारपट्टीवर असणाऱ्या हजारो गावांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सुपारी, आंबे, काजू यांच्या बागा उद्ध्वस्थ झाल्या. अनेक झाडे उन्मळून पडली. वीज प्रवाह खंडित झाला. हजारो घरांचे छप्पर उडाले तर काही घरांची पडझड झाली. लॉकडाउनचा फटका सहन करणाऱ्या गावकऱ्यांचे या वादळाने कंबरडेच मोडले. अशीच वाईट स्थिती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळगाव असलेल्या आंबडवे गावची झाली. वादळाने हे गाव पार नेस्तनाबूत करून टाकले. बाबासाहेबांचे गाव आहे म्हणून अनेक राजकीय नेत्यांनी या गावाला भेट देऊन ते दत्तक घेतले. त्यामागे एकच कारण बाबासाहेबांवर आणि त्यांच्या गावावर कोट्यावधी अनुयायी प्रेम करतात. त्यामुळे त्यांची सहानुभूती आणि मतांसाठी हे गाव दत्तक घेण्याची चढाओढ सुरू झाली.

गावाची व्यथा कळल्यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व गावकऱ्यांना तात्काळ मदत दिली. गावातील लोकांना अन्नधान्य नसल्याचे सांगण्यात आल्याने येत्या दोन दिवसात अन्नधान्य वाटण्यात येईल असेही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितले. सोबतच गावकऱ्यांना मदत म्हणून शाल,चादरीसह इतर वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी घोषणा न करता प्रत्यक्षात मदत देऊन कृती करून दाखविल्याने त्याचा आनंद गावकऱ्यांना झाला. केवळ मतांसाठी नाही तर आपुलकीने प्रकाश आंबेडकर यांनी गावाला भेट देऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण केले. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: