fbpx

आज ग्रहण नसताना पाण्यात उभे राहिले मुसळ!

अं.नि.स.ने केला या चमत्काराचा भांडाफोड

सांगली, दि. 22 – काल दि. 21 जून 2020 रोजी सूर्यग्रहण झाले. या ग्रहणाच्या काळात एका चमत्काराबद्दल महाराष्ट्रात सर्वत्र व्हिडीओ व्हायरल झाला. ग्रहणाचा प्रभाव म्हणून परातीतील पाण्यात मुसळ उभे राहिल्याचे दाखविले गेले. परंतु ग्रहणावेळी मुसळ पाण्यात कसे उभे राहते, तसेच ते ग्रहण नसताना देखील परातीतील पाण्यात उभे राहते. हे सांगली अंनिसच्या शाखेने सप्रयोग सिद्ध केले. जनतेस वैज्ञानिक दृष्टिकोन सांगणार्या भारतीय संविधानास साक्ष ठेऊन हा प्रयोग केला गेला.

या प्रयोगामागे साधा गुरूत्वमध्याचा सिध्दांत आहे. पाण्यात मुसळ उभं राहण्याचा ग्रहणाशी काहीही संबंध नाही.

मग खरं कारण काय? क्षितीजसमांतर सपाट पृष्ठभागाशी काटकोन करून उभी ठेवलेली वस्तू स्थिर राहील की, पडेल हे त्याच्या गुरुत्वमध्यावरून ठरते. गुरुत्वमध्यापासून लंबरूप कल्पिलेली रेषा जर पदार्थाच्या तळातून जात असेल, तर तो पदार्थ स्थिर राहतो. व्यवहारात पदार्थ स्थिर राहण्यासाठी बहुधा त्याचा तळ जड केलेला असतो. तळ जड केल्याने गुरुत्वमध्य खाली राहतो आणि समतोल साधला जातो.

उदाहरणार्थ मुलांच्या खेळण्यातील बाहुलीचा तळ पारा घालून जड केलेला असतो. त्यामुळे ही बाहुली वाकवली तरी परत सरळ उभी राहते. बैलगाडीत उंचपर्यंत माल भरला, तर गुरुत्वमध्य वर जातो आणि गाडीचे एक चाक खड्ड्यात गेल्यास गाडी कलते. त्यामुळे गुरुत्वमध्य बाहेर झुकून गाडी अस्थिर होते.

कर्नाटकातील एका मंदिरात, तसेच कोकणातील एका घरात ग्रहणाच्या वेळी मुसळ उभं राहण्याचा चमत्कार केला जातो व त्याल दैवी वलय चिकटविले जाते; परंतु हे कारण असत्य आहे, हे आम्ही मुसळ परातीत उभं करण्याचा प्रयोग ग्रहण नसलेल्या दिवशी करून सिद्ध केलेले आहे.

हा प्रयोग सांगली अंनिसचे प्रा. प. रा. आर्डे, राहुल थोरात, संजय गलगले, सुहास पवार, सुहास यरोडकर यांनी यशस्वी करून दाखविला.

आजच्या विज्ञानयुगामध्ये कोणत्याही चमत्कारामागे काय कारण आहे, याची तपासणी आपणास वैज्ञानिक दृष्टिकोनाने करता येते. त्यामुळे जनेतेने अशा कोणत्याही चमत्कारावर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आले.

Leave a Reply

%d bloggers like this: