सरकारने सर्वच चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घ्यावी
अरुण पवार यांचे विभागीय आयुक्त व मुख्यमंत्र्याना निवेदन
पुणे , दि, 21 -वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (कैट) चीनमध्ये तयार होणाऱ्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय योग्यच असून, आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घ्यावी. त्याचबरोबर स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्याची भूमिका घ्यायला हवी, अशी मागणी मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी केली आहे.

यासंदर्भात अरुण पवार यांनी विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांना मागणीचे निवेदन दिले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शंकर तांबे उपस्थित होते. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही याबाबत निवेदन पाठविण्यात आले.
या निवेदनात अरुण पवार यांनी म्हटले आहे, की कोविड 19 विषाणू चीनने मुद्दामहून व्हायरल केल्याचे मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. हे मान्य करण्यापेक्षा उलट चीनचा खोडसाळपणा वाढत चालला आहे. चीनकडून सीमेवर कुरघुड्या सुरू आहेत. प्रत्यक्ष ताबारेषेवर तणाव निवळण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात लष्करी स्तरावर चर्चा सुरू असतानाच पूर्व लडाखमधील गलवाण खोऱ्यात अचानक उसळलेल्या अभूतपूर्व संघर्षांमध्ये भारताचे २० जवान शहीद झाले. चीनच्या गोळीबाराला आपले सैनिक योग्य वेळी, योग्य त्या ठिकाणी उत्तर देतील. मात्र, 130 कोटी भारतीयांनी चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकून भारतीय सैन्याच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे. गेल्या वर्षी चीनने मोठ्या प्रमाणात भारतीयांना वस्तू विकल्या आणि नफा कमावला. त्याचा उपयोग त्यांनी लष्कराचे बजेट वाढवण्यासाठी केला. त्यांनी त्यांच्या लष्कराच्या अद्ययावतीकरणासाठी आपला पैसा वापरला. म्हणूनच 130 कोटी भारतीयांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकायला हवा. स्थानिक पातळीवर चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकणे, हे चीनला धडा शिकविण्याचे मोठे अस्त्र असेल. त्यामुळे विभागीय आणि पर्यायाने राज्य पातळीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी अरुण पवार यांनी केली आहे.