Tuesday, June 23, 2026
PUNE

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक शिस्त गरजेची -उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती, दि. 20:  कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक शिस्त निर्माण करावीच लागेल. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासोबतच कोरोनावर संपूर्णपणे मात करण्यासाठी नियम पाळलेच गेले पाहिजेत. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आढावा बैठक घेतली. यावेळी नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे, बारामती पंचायत समितीचे सभापती नीता बारवकर, जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम सभापती प्रमोद काकडे, अपर पोलीस अधीक्षक  मिलिंद मोहिते ,उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील आदी  उपस्थित होते.     

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, भविष्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढू नये, यासाठी प्रशासनाने अधिक दक्ष राहून काम करावे तसेच गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल, हे काटेकोरपणे तपासले पाहिजे. रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे, कोविड आणि नॉन कोविड रुग्ण या दोघांनाही योग्य आणि वेळेत उपचार मिळणे महत्त्वाचे आहे.  तपासणीची प्रक्रिया व्यापक करावी, नागरिकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी बारामती तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या, बरे झालेले रुग्ण, उपचार केलेले रुग्ण तसेच बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना विलगीकरण करण्यासंदर्भातील कार्यवाही आदींची माहिती घेतली.

यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी बारामती तालुक्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचा उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading