‘पुणे आयसीएआय’ व पतंजली योग समिती तर्फे रविवारी लाईव्ह योग प्रशिक्षण
पुणे : सहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया, पुणे शाखा आणि पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने लाईव्ह योग प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पतंजली योग समितीचे प्रितेश केले प्रात्यक्षिकांद्वारे योग मार्गदर्शन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्याप्रमाणे ‘योग ऍट होम, योग विथ फॅमिली’ या संकल्पनेनुसार येत्या रविवारी (दि. २१ जून) सकाळी ८.३० ते ९.३० या वेळेत http://www.youtube.com/puneicaiofficial या संकेतस्थळावर हा कार्यक्रम लाईव्ह होणार आहे. शिवाय, ६ जून पासून एक महिन्याचा विशेष कार्यक्रम ‘योग-आराधना’ संस्थेमार्फत होत आहे.

कोरोनाच्या संकट काळात आपले आरोग्य तंदुरुस्त राहण्यासाठी, स्मरणशक्ती वाढण्यासाठी योगाभ्यास उपयुक्त आहे. योग दिवसाच्या निमित्ताने योग प्रशिक्षण कार्यक्रमात सीए, विद्यार्थी, सीए सभासद, कर्मचारी, प्राध्यापक यांच्यासह सर्वानाच या प्रशिक्षण कार्यक्रमात विनामूल्य सहभाग घेता येणार असल्याची माहिती ‘आयसीएआय’चे अध्यक्ष अभिषेक धामणे यांनी दिली. सर्वांनी आपापल्या घरी लाईव्ह योग करीत या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन धामणे यांनी केले आहे. ‘आयसीएआय’चे उपाध्यक्ष सीए समीर लड्ढा, सचिव व खजिनदार सीए काशिनाथ पठारे यांच्यासह सीए इन्स्टिट्यूटच्या इतर पदाधिकाऱ्यांनीही या विनामूल्य योग प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.