ऑनलाईन क्रिकेट प्रशिक्षण सुरू करणारा पीवायसी हिंदू जिमखाना पहिला क्लब
पुणे, दि . 19 – ऑनलाईनच्या माध्यमातून क्रिकेट प्रशिक्षणाचा उपक्रम पुन्हा एकदा सुरु करण्याचा मान मिळविणारा पहिला क्लब ठरण्याची संधी पीवायसी हिंदू जिमखाना क्लबने साधली आहे.

पीवायसी हिंदू जिमखानाचे मंदिर सचिव आनंद परांजपे याविषयी अधिक माहिती देताना सांगितले की, आधुनिक काळातील प्रशिक्षण तंत्र आणि अत्याधुनिक कोचिंगचा समग्र ढाचा याचा वापर करून क्रिकेट प्रशिक्षणाचा विकास घडविणारा पीवायसी हिंदू जिमखाना हा पुण्यातील आघाडीचा क्लब आहे. केवळ पुण्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील यशस्वी आणि सर्वात भव्य अशी प्रशिक्षण योजना राबविण्याचा मान पीवायसी हिंदू जिमखान्याकडे जातो. सध्याच्या काळाला अनुसरून सर्वांना अतिशय परवडणारी आणि अधिकाधिक खेळाडूंपर्यंत पोहोचणारी प्रशिक्षण योजना तयार करण्याची गरज आम्हाला वाटली त्यातूनच या ऑनलाईनप्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली.
उदयोन्मुख व युवा खेळाडू सध्याच्या काळात आपापल्या घरातच अडकून पडल्यामुळे अतिशय पायाभूत स्तरापासून ते उच्च स्तरापर्यंत क्रिकेटचे प्रशिक्षण घेण्याची संधी त्यांना मिळवून देणे गरजेचे होते. त्यामुळेच अशा खेळाडूंसाठी ऑनलाईन प्रशिक्षण ही संकल्पना काळाची गरजच ठरली आहे, असे पीवायसी हिंदू जिमखानाच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड यांनी सांगितले.
क्लबच्या प्रशिकसंच्या टिममध्ये अनेक माजी रणजी खेळाडूंचा समावेश असून चारुदत्त कुलकर्णी(वेगवान गोलंदाजी व तंदरुस्त), इंद्रजीत कानिटकर(फिरकी गोलंदाजी व क्षेत्ररक्षण) व पराग शहाणे(यष्टीरक्षक)हे प्रशिक्षक ऑनलाईन माध्यमातून खेळाडूंना मार्गदर्शन करणार आहेत.
या प्रशिक्षण योजनेचे मुख्य प्रशिक्षक(फलंदाजी)निरंजन गोडबोले हे असणार असून क्रिकेट विभागाचे संचालक रणजीत पांडे यांनी ही संकल्पना संपूर्ण कोर्सेचे आरेखन अभ्यासक्रम आणि सर्वांगीण प्रशिक्षण या जबाबदाऱ्या स्वीकारल्या आहेत.
ऑनलाईन कोचिंगबाबत अधिक माहिती देताना रणजीत पांडे म्हणाले की, या उपक्रमाचा एक भाग हा मूळ उन्हाळी शिबिरासाठी खास विकसित करण्यात आला होता. बिगीनर्स आणि उदयोन्मुख खेळाडूंना अतिशय अनुभवी व कुशल प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचा लाभ व्हावा, हा यामागील हेतू आहे. इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सगद्वारे या प्रशिक्षण शिबिरातील सर्व सत्रांचे उत्तम आयोजन करण्यात आले.
या शिबिराचा दुसरा टप्पा आगामी मौसमासाठी ज्या खेळाडूंना वैयक्तिक मार्गदर्शनाची गरज आहे अशांकरिता होता. यामध्ये प्रत्येक खेळाडूंसाठी वेगळ्या वैयक्तिक अभ्यासक्रमाची आखणी करण्यात आली. तसेच, त्यांचे कौशल्य आणि गरज याप्रमाणे त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले.
या टप्प्यामध्ये कौशल्य विकासाबरोबरच क्रीडा मानस शास्त्र, आहार नियमन आणि वैयक्तिक गरजेनुसार तंदरुस्त कार्यक्रम याआधारे खेळाडूंच्या मानसिक व शारीरिक कौशल्य विकासावर लक्ष्य केंद्रित करण्यात आले.
क्लबच्या या नव्या संकल्पनेमुळे तसेच ऑनलाईन प्रशिक्षण देण्याच्या या नव्या क्षमतेमुळे संपूर्ण वर्षभराच्या क्रिकेट प्रशिक्षण कार्यक्रमाला खूपच मदत होणार आहे. तसेच, बेभरवशी हवामान आणि पावसाळ्यामुळे मान्सूनमधील बरेच दिवस सराव होत नसल्यामुळे ऑनलाईन प्रशिक्षणाचा हा उपक्रम अतिशय उपयुक्त ठरणार आहे. तसेच ज्या खेळाडूंना प्रत्यक्ष क्लबपर्यंत पोहोचता येते नाही त्या खेळाडूंपर्यंत पोहोचून त्यांना अत्याधुनिक तंत्राद्वारे प्रशिक्षणाचा फायदा करून देणे शक्य होणार आहे.