भंडारा डोंगर ट्रस्ट व मराठवाडा जनविकास संघातर्फे भंडारा डोंगरावर वृक्षारोपण
पिंपरी, दि. 17 – पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघ व भंडारा डोंगर ट्रस्ट यांच्यावतीने राजमाता जिजाऊ यांच्या स्मृतिदिनानिमित्त भंडारा डोंगर येथे वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये वड, चिंच, जांभळ, पिंपळ, आवळा, कडूलिंब, तुती, वाकुळ, उंबर, रूई अशी झाडे लावण्यात आली आहेत. पुढील तीन वर्षे टँकरच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था करून वृक्ष संगोपन ट्रस्टच्या वतीने करण्यात येणार आहे.
अरुण पवार यांनी सांगितले, की आपण प्रत्येकाने एक झाड लावले व जपले तर सर्वत्र वनराई झाल्याशिवाय राहणार नाही. पर्यायाने पर्यावरण सुदृढ राहण्यास मदत होईल. पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने गेल्या आठ नऊ वर्षापासून प्रतिवर्षी किमान दोन हजार वृक्षांची लागवड केली जाते. एवढेच नाही, तर ही झाडे जगली पाहिजेत, म्हणून रोपट्याचे वृक्षात रुपांतर होण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यात त्यांच्या संगोपनाचीही जबाबदारी घेतली जाते. जास्तीत जास्त वृक्षाची जाळीसह लागवड केली जाते. तसेच वृक्षांना गरजेनुसार टॅकरद्वारे मोफत पाणीपुरवठा करण्यात येतो. ही रोपे स्वयंभू होईपर्यंत ट्रस्टमार्फत त्यांची निगा राखण्यात येत आहे.