fbpx

शारिरीक श्रम करणा-यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी पुण्यात वेगळा ट्रस्ट व्हावा- चंद्रकांत पाटील

नगरसेवक हेमंत रासने मित्र परिवाराच्या वतीने मध्यवस्तीतील सफाई कर्मचा-यांचा स्वच्छता सुरक्षा किट देऊन गौरव

पुणे : स्वच्छता कर्मचा-यांकरीता अनेक कायदे आहेत. केंद्र सरकार, राज्य सरकार, महापालिका यांचे अनुदान व योजना आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी तेवढया प्रमाणात होत नाही. स्वच्छता कर्मचा-यांची मुले चांगल्या पद्धतीने शिकली, तर त्यांची परिस्थिती सुधारेल. त्यामुळे शारिरीक श्रम करणा-यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी पुण्यामध्ये वेगळा ट्रस्ट स्थापना व्हावा, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
नगरसेवक व स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने मित्र परिवारतर्फे मोदी सरकारच्या दुस-या सत्रातील वर्षपूर्तीनिमित्त नारायण पेठेतील गोगटे प्रशालेच्या प्रांगणातून शहराच्या मध्यवस्तीत काम करणा-या पुणे महापालिकेच्या सफाई कर्मचा-यांचा स्वच्छता सुरक्षा किट देऊन गौरव करण्यात आला. सुमारे १ हजार ५०० जणांना टप्याटप्याने हे स्वच्छता सुरक्षा किट देण्यात येणार आहेत. यावेळी मुख्य आयोजक श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख व स्थायी समिती अध्यक्ष नगरसेवक हेमंत रासने, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, नगरसेवक राजेश येनपुरे, अ‍ॅड.गायत्री खडके, अजय खेडेकर, प्रमोद कोंढरे, उदय लेले आदी उपस्थित होते. चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात आला.
चंद्रकांत पाटील म्हणाले, कोल्हापूरामध्ये आम्ही संवेदना ट्रस्टच्या माध्यमातून कष्टक-यांच्या ३०० मुलींचे शिक्षण करीत आहोत. आमचा प्रयत्न ३ हजार मुलींना शिक्षण देणे, असा आहे. कष्टक-यांच्या मुली शिकल्या, तर कुटुंब अधिक सक्षम होतील. त्यामुळे त्यांची जबाबदारी आपण घ्यायला हवी. पुणेकरांच्या आरोग्यासाठी झटणारी ही कष्टकरी मंडळी आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्य व कुटुंबाला सक्षम करण्याकरीता आपण पुढे यावे.
हेमंत रासने म्हणाले, महात्मा गांधी यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला स्वच्छतेचा मंत्र दिला. त्यामुळे जे स्वच्छता कर्मचारी शहराची व देशाची साफसफाई करतात, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यामुळेच आम्ही १ हजार ५०० स्वच्छता कर्मचा-यांना स्वच्छता सुरक्षा किट देत आहोत. मास्क, हँडग्लोव्हज्, सॅनिटायजर आदी साहित्यासह ताप मोजण्याकरीता डिजिटल थर्मामीटर देखील किटमध्ये आहेत. त्यांच्या आरोग्याच्या काळजीप्रमाणेच कर्मचा-यांच्या मुलांचे शिक्षण उत्तमरितीने व्हावे, याकरीता देखील वेगळे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: