fbpx
Monday, September 25, 2023
MAHARASHTRA

निरपराध नागरिकांना पोलिसांकडून मारहाण, तक्रार घेण्याऐवजी चार तास डांबून ठेवले

अकोला, दि. १५ – पोलिसांनी जप्त केलेली मोटर सायकल सोडविण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांना रामदास पेठ पोलिसांनी बेदम मारहाण केली. या मारहाणी विरोधात तक्रार देणाऱ्या तरुणांनाच पोलिसांनी चार तास डांबून ठेवल्याचा प्रकार अकोला येथील रामदास पेठ पोलीस ठाण्यात घडला. या पोलिसांविरोधात जिल्हा पोलीस अधीक्षक आणि गृहमंत्र्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी दिली.

लोणाग्र येथे राहणारा दीपक गवई यांची दुचाकी पोलिसांनी जप्त केली होती. दुचाकी सोडविण्यासाठी निखिल सिरसाट हा दीपक बरोबर रामदास पेठ पोलीस ठाण्यात गेला होता. यावेळी सुट्टीवर असलेला पोलीस शिपाई गणेश पाटील याने या दोघांबरोबर वाद घालून त्यांना शिवीगाळ केली. यावरच तो थांबला नाही तर या दोन्ही तरुणांना त्याने बेदम मारहाण केली. शिवाय सुट्टीवर असताना देखील पाटीलने या दोन तरुणाविरोधात स्टेशन डायरीत नोंद करून ठेवली. याबाबत या तरुणांनी गणेश पाटील विरोधात रामदास पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी तक्रार घेण्याऐवजी या तरुणांनाच पोलीस ठाण्यात डांबून ठेवले. अखेर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप केल्यावर पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली. त्यानंतर दोन्ही तरुणांना वैद्यकीय तपासणी न करता सोडून दिले.

पोलीस शिपाई गणेश पाटील याच्याविरोधात यापूर्वीही तक्रारी आलेल्या आहेत. मात्र वरिष्ठ अधिकारी या वादग्रस्त शिपायाला नेहमी पाठीशी घालत असल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणातही पोलीस निरीक्षक मुकुंद ठाकरे हे जबाबदार असून ते गणेश पाटील याला पाठीशी घालत आहे. गणेश पाटील विरोधात गुन्हा दाखल करून पोलीस निरीक्षक मुकुंद ठाकरे यांना सहआरोपी करण्यात यावे तसेच त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी तक्रार वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी गृहमंत्री व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: