ग्राहक पेठेमध्ये स्वदेशी आणि विदेशी चे स्टिकर्स
ग्राहक पेठेतर्फे पुढाकार ; गेल्या अनेक वर्षांपासून केली जाते जनजागृती
पुणे : भारत-चीनमधील तणावपूर्ण संबंध आणि देशभर वाहत असलेले स्वदेशीचे नारे या पार्श्वभूमीवर पुण्यातील टिळक रस्त्यावरील ग्राहक पेठेमध्ये ग्राहकांना स्वदेशी व विदेशी यातून हवी ती वस्तू निवडता येणार आहे. वस्तूंच्या रॅकवर ‘स्वदेशी’ आणि ‘विदेशी’ असे स्टिकर लावण्यात आले असल्याने स्वदेशी वस्तूंची निवड करण्याकडे ग्राहकांचा कल असल्याचे दिसून आले आहे.
ग्राहक पेठेमध्ये विक्रीसाठी उपलब्ध वस्तूंवर ‘विदेशी व ‘स्वदेशी’ असे स्टिकर लावून त्याद्वारे ग्राहकांचे प्रबोधन करण्यात येत आहे. त्यामुळे स्वदेशीचा आग्रह करणा-या ग्राहकांना वस्तूंची निवड सहज करता येत आहे. ग्राहक पेठेची स्थापनाच स्वदेशी चळवळीला पाठिंबा देण्यासाठी झाली आहे. परकीय वस्तू विकण्याचा परवाना असतानाही ग्राहक पेठेने परकीय वस्तूंची विक्री केली नव्हती. मध्यंतरी स्वदेशी आंदोलन सुरू झाले, तेव्हाही ग्राहक पेठेने स्वदेशी वस्तूच विकल्या होत्या.
ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक व अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सूर्यकांत पाठक म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आत्मनिर्भर भारताचे आव्हान यामुळे ग्राहकांमधील जागरूकता वाढली आहे. त्यामुळे स्वदेशी वस्तू खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. परंतु कोणती वस्तू स्वदेशी आणि कोणती वस्तू विदेशी हे ग्राहकांना पटकन समजत नाही. त्यामुळे ग्राहक पेठेमध्ये आम्ही स्वदेशी व विदेशी असे स्टिकर लावण्याची संकल्पना सुरु केली. गेल्या वर्षी डिसेंबरपासूनच आम्ही स्वदेशी व विदेशी वस्तूंबाबत ग्राहकांचे प्रबोधन सुरू केले.
लॉकडाऊन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एका वेळी ग्राहक पेठेमध्ये जास्त ग्राहकांना सोडणे शक्य होत नाही. तरीही ग्राहक स्वदेशी वस्तू खरेदी करण्यासाठी रांगेत उभे रहात असल्याचे चित्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वदेशीच्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्राहक देखील ग्राहक पेठेच्या संकल्पनेला पाठिंबा देत असल्याचे चित्र आहे.