fbpx

विराजची हत्या करणाऱ्यांना फाशी व्हावी – रामदास आठवले

पुणे, दि. 13 – विराज जगताप यांची हत्या करणा-या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. तसेच संबंधीत घटनेतील तरुणीला सहआरोपी करावे. अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पिंपरी येथे केली.

7 जून रोजी पिंपळे सौदागर येथील विराज जगताप या बौध्द तरुणाची निर्घुण हत्या करण्यात आली. केंद्रीय मंत्री आठवले यांनी आज सायंकाळी जगताप यांच्या कुटूंबांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. यानंतर पिंपरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. यावेळी आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे, सुरेश निकाळजे, परशूराम वाडेकर, बाळासाहेब रोकडे, के.एम. बुख्तर, सम्राट जकाते, सुधाकर वारभुवन आदी उपस्थित होते.

यावेळी आठवले म्हणाले की, विराजची हत्या ही घटना अंत्यत गंभीर आहे. महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते की, सवर्ण, मराठा आणि मागासवर्गीय समाज एकत्र आला पाहिजे. जाती जातीमधील कटूता नष्ट झाली पाहिजे. मराठा समाज व मागासवर्गीय समाजाने राज्यात गुण्या गोविंदाने रहावे यासाठी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आपण नेहमी प्रयत्नशील असतो. पुणे, पिंपरी – चिंचवडसह महाराष्ट्रातील व देशातील कोरोना विषयीची परिस्थिती गंभीर आहे. हा संसर्गजन्य आजार असून सर्वांनी सोशल डिस्टन्स पाळावे असे आवाहन आठवले यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीला 1 लाख 70 हजार कोटी रुपये त्यानंतर 11 कोटी रुपये कोरोनाच्या उपचारासाठी जाहीर केले. तसेच 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केले आहे. लॉकडाऊन काळात आजपर्यंत 56 लाखांहून जास्त मजूरांना आपआपल्या गावी जाण्यासाठी केंद्र सरकारने प्रवासी ट्रेनच्या माध्यमातून मदत केली. तसेच आता कारखाने सुरु होताना या मजूरांना पुन्हा कामाच्या ठिकाणी आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे बीजेपीशी दोन हात करु इच्छितात परंतू कोरोनाशी दोन हात करण्यामध्ये त्यांना अपयश आले आहे. शाळा सुरु झाल्या पाहिजेत परंतू कोरोनावर नियंत्रण मिळाल्याशिवाय शाळा सुरु करणे योग्य ठरणार नाही. पालकांना शाळेंनी फी साठी तगादा लावू नये. अशा शाळांवर राज्य सरकारने कारवाई करावी. विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्याबाबत राज्यपालांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. तसा त्यांना अधिकार आहे. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे परिक्षे शिवाय मुल्यांकन करणे योग्य ठरणार नाही. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ज्या झोपडपट्टी व वस्त्यांमध्ये कोरोना रुग्ण सापडल्यानंतर कन्टेनमेंट झोन केला आहे. तेथील नागरिकांना अन्न, धान्य, भाजीपाला, दुध या अत्यावश्यक सुविधा देण्याची जबाबदारी मनपाने घ्यावी, अशी मागणी आठवले यांनी केली.

Leave a Reply

%d bloggers like this: