Good News महाराष्ट्रात मॉन्सूनचे आगमन
पुणे, दि. ११- नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) आज (गुरुवार) महाराष्ट्रात दाखल झाला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिण भागात मॉन्सूनने प्रगती केली आहे. संपुर्ण कर्नाटक, गोवा, आणि रायलसिमाचा भाग व्यापणाऱ्या मॉन्सूनने हर्णे, सोलापूरपर्यंत मजल मारल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. शनिवारपर्यंत राज्याच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होण्यास पोषक हवामान आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र मॉन्सून वाटचालीस पोषक ठरत आहे. गुरूवारी मोठी मजल मारणाऱ्या वाऱ्यांनी आंध्र प्रदेशचा किनारपट्टीय भाग, तेलंगणा, दक्षिण ओडीशा, बंगालच्या उपसागरात प्रगती केली आहे. तर ईशान्य भारतातून पुढे चाल करत, नागालॅंड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा ही राज्ये संपुर्णपणे व्यापून, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालयाच्या काही भागात प्रगती केल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान बुधवारी बंगालच्या उपसागरात वाऱ्यांनी प्रगती केली. त्रिपुरा आणि मिझोरामधील आगरतळा, कोहीमापर्यंत मॉन्सून दाखल झाला होता. मात्र अरबी समुद्रातील वाटचाल पाहता बुधवारी मॉन्सूनने संपुर्ण तामिळनाडू राज्य व्यापले होते. दुसऱ्याच दिवशी गुरूवारी अरबी समुद्रावरून मोठा टप्पा पार करून मॉन्सून महाराष्ट्रात दाखल झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.