fbpx

कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे १२३ व्या वर्धापनदिनानिमित्त सर्व कार्यक्रम स्थगित करुन खर्च भोजन सहाय्य योजनेकरीता करणार

‘दगडूशेठ दत्तमंदिर’तर्फे विद्यार्थ्यांकरीता भोजन सहाय्य योजना अव्याहतपणे ८५ दिवस
पुणे : बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराच्या १२३ व्या वर्धापनदिनानिमित्त दत्तमंदिर ट्रस्टतर्फे दरवर्षी होणारा लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा व महाप्रसाद स्थगित करण्यात आला. कार्यक्रम व महाप्रसादाकरीता होणारा खर्च ट्रस्टतर्फे विद्यार्थी भोजन सहाय्य योजनेकरीता करण्यात येणार आहे. लॉकडाऊन झाल्यापासून आजपर्यंत सलग ८५ दिवस ही योजना कार्यरत असून दररोज १०० हून अधिक विद्यार्थ्यांना भोजन दिले जाते.

दत्तमंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त मंदिरात माध्यान्य आरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, कार्यकारी विश्वस्त युवराज गाडवे, उत्सवप्रमुख शिरीष मोहिते यांसह कर्मचारी उपस्थित होते. तसेच वर्धापनदिनानिमित्त फुलांचे तोरण व मर्यादित स्वरुपात फुलांची आरास देखील करण्यात आली.

अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरीता अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, याचा सर्वाधिक फटका पुण्यामध्ये बाहेरील गावांतून आलेल्या विद्यार्थ्यांना बसला आहे. बाजारपेठ, हॉटेल्स, खानावळी बंद असल्याने दैनंदिन जेवणाचा प्रश्न समोर आला होता. त्यामुळे लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरतर्फे अशा विद्यार्थ्यांकरीता भोजन सहाय्य योजना गेल्या ८५ दिवसांपासून सुरु आहे.

शिरीष मोहिते म्हणाले, कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील अभ्यासिकांमध्ये असलेल्या परगावच्या विद्यार्थ्यांना निबंर्धांमुळे खानावळी बंद झाल्याने ट्रस्टतर्फे दुपारचे जेवण पार्सल स्वरूपात देण्यात येत आहे. तयार भोजन पार्सल नेताना परगावचे रहिवासी असल्याचा पुरावा (आधार कार्ड) व अभ्यासिका ओळखपत्राची झेरॉक्स प्रत मंदिरात दाखवून ही सेवा दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: