fbpx
Saturday, December 2, 2023
MAHARASHTRA

वारकऱ्यांमध्ये अजित पवार यांचा दुजाभाव, विदर्भातील वारकऱ्यांना ही परवानगी देण्यात यावी – प्रकाश आंबेडकर

पुणे, दि. ९ – आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाऊन आपल्या विठोबाचे दर्शन घेण्यासाठी लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला जात असतात. विटेवरी उभा त्या विठोबाला साक्षपूर्ण नयनांनी पहावे, हि एकच ईच्छा प्रत्येक वारकऱ्यांची असते. तेव्हाच ही वारी सफल झाल्याचे ते समजतात. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी चालत जाण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. केवळ पश्चिम, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागातील काही वारकरी प्रतिनिधींना पंढरपूरला जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. यात विदर्भातील एकाही वारकरी संस्थेचा समावेश नाही. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विदर्भावर दुजाभाव केला असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

राज्यात लॉकडाऊन शिथिल करण्यात आले असले तरी लोकांना गर्दीच्या ठिकाणी जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्यामुळे आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या पालख्याना यंदा परवानगी नाकारण्यात आली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पश्चिम, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्या मधील वारकरी प्रतिनिधींची एक बैठक घेऊन यातील पाच प्रतिनिधींना पंढरपूरला जाण्याची परवानगी देण्यात आली. मात्र विदर्भातील एकाही वारकरी प्रतिनिधीला पंढरपूरला जाण्याची परवानगी देण्यात न आल्याने हा त्यांच्यावर अन्याय आहे. विदर्भात देखील संतांची भूमी आहे. अनेक वारकरी विदर्भातुन चालत पंढरपूरला येतात. शासनाने दिलेला निर्णय मान्य असल्याचे त्यांनी सांगितले असले तरी पुण्यातील वारकरी प्रतिनिधींना पंढरपूरला जाण्याची परवानगी देण्यात आली आहे, तशीच परवानगी विदर्भातील वारकरी प्रतिनिधींना देण्यात यावी, अशी मागणी विदर्भातील वारकऱ्यांनी केली आहे.
दरम्यान अजित पवार यांनी बैठकीला विदर्भातील एकाही वारकरी प्रतिनिधींना बोलावले नव्हते. अजित पवार यांनी वारकऱ्यांमध्ये ही राजकारण केले आहे. मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी यामध्ये लक्ष घालावे आणि विदर्भ आणि नॉन विदर्भ असे वारीच्या निमित्ताने जी विभागणी झाली आहे, त्याकडे लक्ष द्यावे. तसेच विदर्भातील तीन ते चार वारकरी संस्थांना पंढरपूरला जाण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: