Thursday, September 3, 2026
MAHARASHTRA

गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा झाल्याने कर्तव्यावरील पोलीस अधिकारी भारावला!

मुंबई दि.८- कुठलाही सण असो, समारंभ असो पोलीस मात्र नेहमीच रस्त्यावर किंवा इतर ठिकाणी कर्तव्य बजावताना दिसतात. मात्र बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्याचा वाढदिवस जर पोलीस दलाच्या कुटुंबप्रमुखाच्या उपस्थितीत साजरा झाला तर? किवळे फाटा येथे कर्तव्य बजावणारे पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांना हे भाग्य लाभलं. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा झाल्याने श्री. जाधव भारावले.

गृहमंत्री अनिल देशमुख  काल पुणे येथे दौऱ्यावर होते. आज सकाळी पुण्यावरुन मुंबईला येताना एक्सप्रेस हायवेवर थोडा वेळ थांबून त्यांनी किवळे फाटा येथे कर्तव्यावर असलेले पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. पोलिसांना मिळणाऱ्या सोयीसुविधा, अडीअडचणींबाबत चर्चा केली. या चर्चे दरम्यान त्यांना समजले की बंदोबस्तासाठी असलेले पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवस असूनही  कुटुंबापासून दूर आपले कर्तव्य  बजावणाऱ्या श्रीकांत जाधव यांचे गृहमंत्र्यांना कौतुक वाटले.  केवळ कौतुकच नव्हे तर  राज्याचा गृहमंत्री पण पोलीस विभागाचा कुटुंब प्रमुख या नात्याने गृहमंत्री श्री. देशमुख पोलीस उपनिरीक्षकाच्या आनंदात सामील झाले.त्यांचा वाढदिवस केक कापून साजरा केला.  त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या आणि मुंबईकडे मार्गस्थ झाले.

दस्तुरखुद गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत आपला वाढदिवस साजरा होत आहे. हे पाहून श्री. जाधव व तेथील उपस्थित सर्व पोलीसअधिकारी,कर्मचारी आनंदले. अशा प्रकारे साजरा केलेला हा वाढदिवस श्री. जाधव यांच्या कायम स्मरणात राहील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading