fbpx
Monday, October 2, 2023
MAHARASHTRA

सोनू सूद भाजपचा स्टार प्रचारक, ‘सामना’तून हल्लाबोल

मुंबई, दि. ७ – “ अभिनेता सोनू सूद यांनी गेल्या काही दिवसांत हजारो मजुरांना त्यांच्या राज्यात परत पाठवले. रेल्वे, बसेस, विमानाची तिकिटे त्यांनी काढली. प्रवासाची व्यवस्था केली. सोनू सूदचा चेहरा पुढे करून महाराष्ट्रातले काही राजकीय घटक ‘ठाकरे सरकार’ला अपयशी ठरवण्याचा परत्न करीत होते. भाजपमधील काही लोकांनी सोनूला दत्तक घेतले. त्याला पुढे ठेवून उत्तर भारतीय मजुरांत घुसण्याचा प्रयत्न झाला. सोनू सूद या महात्म्याचे नाव आता पंतप्रधान मोदींच्या एखाद्या ‘मन की बात’मध्ये येईल. मग ते दिल्लीत पंतप्रधानांच्या भेटीस निघतील व एक दिवस ते भाजपचे स्टार प्रचारक म्हणून मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये फिरताना दिसतील.”, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक या सदरातून केली आहे.

सोनू सूद यांचा पुढील राजकीय चित्रपट कोणता? असा प्रश्न उपस्थित करत संजय राऊत यांनी काही आरोप केले आहेत. काही वर्षांपूर्वी कोब्रा पोस्टच्या एका स्टिंग ऑपरेशनने सोनू सूदच्या व्यवहाराचा भांडाफोड केला आहे सोशल माध्यमांवर इन्स्टाग्राम, ट्विटर अकाऊंटवरुन छुप्या पद्धतीने भाजपच्या कार्याचा उदोउदो करण्याचे त्याने मान्य केले होते. त्यासाठी महिन्याला दीड कोटी इतकी बिदागी त्याने मागितली होती. पैसे मिळाले तर कुणाचाही मुखवटा लावून वावरायचे आणि प्रचार करायचा हे सूदसारख्या अनेकांचे धंदे आहेत, अशी टीका राऊत यांनी लेखात केली आहे.

तसेच “कोरोना काळात भाजप अस्तित्वासाठी झगडत होता. ठाकरे सरकारवर सतत करत असलेल्या टीकेमुळे भाजप लोकांच्या मनातून उतरला. मजुरांच्या पायपिटीवरुन देशांत मोदी सरकारविरुद्ध असंतोष पेटला, तर महाराष्ट्रात भाजपने ठाकरे सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. या गोंधळात भाजपने सोनू सूदला महान समाजसेवकाचा मुखवटा लावून प्यादे म्हणून वापरले काय? असाही प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: