fbpx

मावळ, जुन्नर, खेड तालुक्यामध्ये बहुतांश भागातील वीजपुरवठा पूर्वपदावर; सर्वच उपकेंद्र सुरु

पुणे, दि. 05 मावळ, खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्यात महावितरणची जमीनदोस्त झालेली वीजयंत्रणा पुन्हा उभारण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु असून पावसामुळे निसरडा झालेला डोंगराळ भाग, चिखल, शेकडो पडलेली झाडे, फांद्या आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत महावितरणचे 200 अभियंता व 1250 कर्मचारी रात्रंदिवस वीजयंत्रणेची दुरुस्ती करीत आहे.

दरम्यान, ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर मावळ, जुन्नर, खेड व आंबेगाव तालुक्यातील बंद पडलेले 33/11 केव्ही क्षमतेचे सर्वच 47 उपकेंद्र गेल्या 24 तासांमध्ये सुरु करण्यात यश आले आहे. या उपकेंद्रांमधून निघणाऱ्या 309 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा देखील सुरु करण्यात आला आहे. सद्यस्थितीत जुन्नर व मावळ भागातील अतिदुर्गम व मोठ्या प्रमाणावर हानी झालेल्या 78 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा सुरु करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. अनेक ठिकाणी झाडे व फांद्या पडल्याने तसेच दुर्गम भाग असल्याने दुरुस्ती कामांना वेळ लागत आहे.

पुणे ग्रामीण मंडलमधील मावळ, खेड, जुन्नर, आंबेगाव या चार तालुक्यांमध्ये वीजयंत्रणेच्या उभारणीसाठी महावितरणचे 200 अभियंते व 800 जनमित्र तसेच कंत्राटदारांचे 450 कर्मचारी कार्यरत आहेत. प्रादेशिक संचालक (प्र) अंकुश नाळे यांनी विविध ठिकाणी भेटी देऊन वीजयंत्रणेच्या दुरुस्तीची व झालेल्या नुकसानीची पाहणी केली. मुख्य अभियंता सचिन तालेवार, अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार यांच्यासह महावितरणचे अभियंते व कर्मचारी मावळ, जुन्नर तालुक्यांमध्ये बंद असलेली वीजयंत्रणा पुन्हा उभारणीसाठी रात्रंदिवस युद्धपातळीवर काम करीत आहेत. येत्या 24 तासांमध्ये दुर्गम व अतिदुर्गम भागातील बंद असलेली उर्वरित वीजयंत्रणा कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे.

पुणे शहरामध्ये कोंढवा परिसरात एक रोहित्र, वाकड व हिंजवडी परिसरातील तीन रोहित्रांचा तसेच भोसरीमधील एस ब्लॉकमधील दोन रोहित्रांचा वीजपुरवठा आज रात्रीपर्यंत सुरु करण्यात येत आहे. वीजवाहिन्यांवर झाडे व फांद्या पडल्याने अनेक ठिकाणी वीजतारा तुटल्यामुळे विलंब होत होता. मात्र दुरुस्ती पूर्णत्वाकडे आहे. ही सहा रोहित्र वगळता पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सर्वच भागात वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. सद्यस्थितीत सर्व्हिस लाईनवर फांद्या पडल्यामुळे त्या तुटल्याने किंवा वादळा दरम्यान इतर कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्याच्या वीजग्राहकांच्या वैयक्तिक तक्रारी निवारणाचे काम वेगाने सुरु आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: