fbpx
Thursday, September 28, 2023
PUNE

मनोकायिक विकारांवर उपचार करताना संगीतोपचाराचाही विचार व्हावा :तज्ज्ञांची अपेक्षा

‘म्युझिक थेरपी’वर तज्ज्ञांच्या फेसबुक लाईव्ह संवादाला प्रतिसाद, ‘ट्रू वेल्थ इंटिग्रेटीव्ह हेल्थ सेंटर’ चा उपक्रम

पुणे, दि. ५ – ‘संगीतातील सूर आणि शब्द आपल्या मेंदूतील डोपामाईन या आनंदलहरी निर्माण करणाऱ्या हार्मोनच्या निर्मितीला उत्तेजना देत असल्याने मनोकायिक विकारांमध्ये त्याचा सकारात्मक उपयोग होतो. यामागच्या न्यूरोसायन्सवर आणखी संशोधन होण्याची आवश्यकता आहे.शारीरिक तसेच मनोकायिक विकारांवर उपचार करताना संगीतोपचाराचाही विचार व्हावा अशी अपेक्षा या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली.

‘शारीरिक आणि मनोविकारांवर संगीतोपचाराचा होणारा परिणाम'(म्युझिकथेरपी)या विषयावर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा फेसबुक लाईव्ह संवाद ४ जून रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला होता.’ट्रू वेल्थ इंटिग्रेटीव्ह हेल्थ सेंटर’ने आयोजित केलेल्या या संवादात न्यूरोसर्जन डॉ.शिरीष हस्तक,संगीतोपचार तज्ज्ञ डॉ.आसावरी ठोंबरे,आहारतज्ज्ञ राजश्री गाडगीळ सहभागी झाल्या.लर्निंग डिसॅबिलिटी,पार्किन्सन्स,डिप्रेशन,हायपर टेन्शन,मधुमेह या बाबतीत संगीतोपचारांची आणि परिणामांची चर्चा या संवादादरम्यान करण्यात आली.

न्यूरोसर्जन डॉ.शिरीष हस्तक म्हणाले,’म्युझिक थेरपी(संगीतोपचार) हे मानवी मेंदूला उद्दीपित करतात आणि उपचारही करतात.संगीतातील सूर आणि शब्दांचा मानवी मनावर,मेंदूवर परिणाम होत असतो.सूर आणि शब्दांचे रूपांतर भावनांमध्ये होते.संगीतोपचाराने विचारात सहजता येते.तर स्वतः गायन करणे,वाद्य वाजवणे हे मेंदूचा,मनाचा व्यायाम करण्यासारखे आहे.शारीरिक तसेच मनोकायिक विकारांवर उपचार करताना आपण बाह्य घटकांचा विचार करतो तसाच आतून मदत करणाऱ्या संगीतोपचारांसारख्या घटकांचाही विचार केला पाहिजे.संगीत,गायन आणि वादन हे मनांतर्गत घडणाऱ्या क्रिया मानवी मनाला मुक्त करतात.पार्किन्सन्स,डिमेन्शिया सारख्या विकारात म्युझिक थेरपीचा चांगला उपयोग झाल्याचे दिसून आले आहे.

डॉ. आसावरी ठोंबरे म्हणाल्या,’संगीतोपचाराला आयुर्वेदाचा पाया आहे.वात,कफ,पित्त प्रकृतीनुसार या उपचारांचा परिणाम दिसून येतो.हे त्रिगुणात्मक दोष बिघडले कि प्रकृती बिघडते,विकार निर्माण होतात.शास्त्रीय संगीतात गानसमय जे दिले आहेत,या तीन दोषांचा विचार करून ते ठरवलेले आहेत.संगीतोपचाराने मानसिक थकवा जातो.प्रतिकार शक्ती वाढते आणि शारीरिक-मानसिक विकार वाढण्याची प्रक्रिया कमी होते.शरीरात अनुकूल जैविक आणि रासायनिक बदल घडवून आणण्यात म्युझिक थेरपीचा उपयोग होतो.स्ट्रोक येणे,ऑटिझम,सेरेब्रल पाल्सी,डाऊन सिंड्रोम,एपिलेप्सी,मायग्रेन या विकारांमध्ये म्युझिक थेरपी उपयुक्त ठरते.यावर अजून अभ्यास आणि संशोधन उपयुक्त ठरेल.’

या फेसबुक लाईव्ह संवादामध्ये विजय ठोंबरे आणि एड.नंदकुमार राजूरकर यांनीही आपले अनुभव मांडले.’ट्रू वेल्थ इंटिग्रेटीव्ह हेल्थ सेंटर’च्या संचालक राजश्री गाडगीळ यांनी संयोजन केले.

http://www.facebook.com/truwellth आणि http://www.truwellth.in/live या लिंक वर हा संवाद पाहता,ऐकता येईल.

Leave a Reply

%d bloggers like this: