fbpx
Friday, December 8, 2023
MAHARASHTRAPUNE

कोरोनाचा रुग्णदर व मृत्यूदर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करा – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

पुणे,दि.५:  जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासनाने सूक्ष्म नियोजन करुन कोरोनाचा रुग्णदर व मृत्यूदर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करावे, अशा सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केल्या जाणाऱ्या उपाययोजना तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये देण्यात येत असलेल्या सेवा सुविधा, आवश्यक वैद्यकीय साधनसामग्री व आगामी काळात करावयाच्या उपाययोजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कालिंगम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, ससूनचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे आदींसह  विविध विभागांचे अधिकारी व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांचे म्हणणे व सूचना ऐकून घेतल्यानंतर श्री. देशमुख म्हणाले, शहर व ग्रामीण भागातील रुग्णांना बेडच्या उपलब्धतेबद्दल माहिती होण्यासाठी तसेच वेळेत वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी प्रशासनाने शासकीय व खाजगी रुग्णालयाचे व्यवस्थापन योग्य तऱ्हेने हाताळावे. कोविड-19 विरुध्दच्या लढाईत आरोग्य विभाग अग्रेसर आहे. आरोग्य विभागासह या लढ्यात सहभागी असणाऱ्या अन्य विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाचे त्यांनी कौतुक केले. तसेच या काळात आरोग्य व अन्य विभागात कार्यरत असणाऱ्या डॉक्टर, परिचारीका, स्वच्छता कर्मचारी आदींना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, याची दक्षता घेवून आवश्यक तपासणी करुन घ्यावी, असे सांगून कोरोनामुळे आजवर काहींना आपला जीव गमवावा लागला, त्याबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले.  रुग्णांवर वेळेत उपचार होण्यासाठी राज्य शासन सुरुवातीपासूनच सक्रीय आहे. शासकीय तसेच खाजगी रुग्णांलयांना पीपीई कीट, मास्क, सॅनिटायझर, औषधसाठा कमी पडणार नाही, याची दक्षता घेण्यात येत असून यापुढेही राज्य शासन आवश्यक त्या सेवा सुविधा गतीने उपलब्ध करुन देईल, असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.

कोरोनाच्या अनुषंगाने घ्यावयाच्या दक्षतेबद्दल जनजागृतीवर भर देणे आवश्यक आहे. कोविड बरोबरच अन्य आजारांच्या रुग्णांकडे दुर्लक्ष होता कामा नये, याची दक्षता घ्यावी.  झोपडपट्टी परिसरात तपासणी क्षमता वाढवून उच्च रक्तदाब,  मधुमेह, श्वसन विकार आदी आजार असणाऱ्या नागरिकांची विशेष काळजी घ्यावी, असे सांगून  त्यांच्यावर प्रतिबंधात्मक  उपाययोजना म्हणून  निर्धारीत करण्यात आलेला औषधोपचार करावा, असेही वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी म्हणाले.

यावेळी  कोरोनाच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेले नियंत्रण कक्ष, शासकीय व खाजगी रुग्णालयाचे व्यवस्थापन, प्रशासनाच्या उपाययोजना, स्वॅब तपासणी क्षमता, ‘मिशन बिगिन अगेन’ आदी विविध विषयांचा आढावा श्री. देशमुख यांनी घेतला.

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पुणे विभागात आजवर तपासणी करण्यात आलेले नागरिक, यापैकी बाधित रुग्ण, मृत्यू झालेल्या नागरिकांची वैद्यकीय पार्श्वभूमी, बरे होवून घरी गेलेल्यांची संख्या, करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

एस. चोक्कलिंगम यांनी ससून रुग्णालयाच्या वतीने देण्यात येत असलेल्या वैद्यकीय सेवा-सुविधांची माहिती दिली.

महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी रुग्णदर व मृत्यूदर कमी होण्यासाठी महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या व यापुढील कालावधीत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली.

मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामीण भागात कोरोना नियंत्रणासाठी सुरु असलेल्या उपाययोजनांबाबत सादरीकरण केले.

ससूनचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी ससून रुग्णालयामध्ये आतापर्यंत दाखल करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या, वयोमानानुसार रुग्ण दर, मृत्यूदर, क्षेत्रनिहाय दाखल रुग्ण, अतिदक्षता विभाग व अन्य विभागात देण्यात येत असलेल्या सुविधा आदींची माहिती दिली.

Leave a Reply

%d