fbpx
Saturday, December 2, 2023
PUNE

कृती आराखड्यानुसार महावितरणच्या वीजयंत्रणेची दुरुस्ती युद्धपातळीवर सुरु

प्रादेशिक संचालक श्री. नाळे यांची माहिती

पुणे, दि. 05 – ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्यात प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 2650 वीजखांब नादुरुस्त झाले आहेत. ही वीजयंत्रणा पुन्हा उभारण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. दुरुस्ती कामांसाठी विविध योजनेतील कंत्राटदारांचे सहाय्य घेतले जात असून महावितरणचे इतर भागातील अभियंते व कर्मचारी यांना प्रतिनियुक्तीवर दुरुस्ती कामांसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी दिली.

गेल्या दोन दिवसांत पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेटी देऊन श्री. नाळे यांनी तडाखा बसलेल्या वीजयंत्रणेची व दुरुस्ती कामांची पाहणी केली. या दरम्यान त्यांनी अभियंते व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून विविध अडचणी समजून घेतल्या. अहोरात्र अविश्रांत काम करून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी झुंज देणाऱ्या सर्व अभियंते व कर्मचाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले.

वीजयंत्रणेची ताबडतोब दुरुस्ती करून किंवा पर्यायी तसेच इतर तात्पुरत्या व्यवस्थेतून सर्वप्रथम वीजग्राहकांचा वीजपुरवठा सुरु करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. सद्यस्थितीत मावळ व जुन्नर भागातील 78 वगळता जिल्ह्यातील सर्व वाहिन्यांचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे. सद्यस्थितीत खंडित वीजपुरवठ्याबाबत ग्राहकांनी नोंदविलेल्या वैयक्तिक तक्रारी निवारणाचे काम वेगाने सुरु आहे. या संकटाच्या कालावधीत वीजग्राहकांनी महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी केले.

मावळ, जुन्नर तालुक्यांच्या दुर्गम व अतिदुर्गम, घनदाट झाडांच्या भागात वीजयंत्रणेची पुन्हा उभारणी करण्यास वेग देण्यासाठी महावितरणच्या विविध योजनेतील जिल्ह्यातील कंत्राटदारांना त्यांच्या कर्मचाऱ्यांसह पाचारण करण्यात आले आहे. हे कंत्राटदार व कर्मचाऱ्यांना आवश्यक साधनसामग्रीसह रवाना झाले आहे. यासोबतच जिल्ह्यातील इतर भागातील अभियंते व कर्मचारी सुद्धा प्रामुख्याने मावळ, जुन्नर आदी भागात प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आहेत. वीजयंत्रणेच्या उभारणीसाठी दुरुस्ती कामाचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याप्रमाणे नियोजनपूर्वक काम करण्यात येत आहे अशी माहिती प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: