सोशल मीडियावर ‘#युवराज_सिंह_माफी_मांगो’ ट्रेंडिंग
सोशल मीडियावर काल सोमवार रात्रीपासून ‘#युवराज_सिंह_माफी_मांगो’ हा ट्रेंड भारतात पहिल्या क्रमांकावर आहे. एका सोशल मीडिया व्हिडिओ चॅटदरम्यान भारताचा माजी खेळाडू युवराज सिंहने जातीवाचक शब्द उच्चारल्याने सोशल मीडियवर वाद निर्माण झाला आहे. #युवराज_सिंह_माफी_मांगो या हॅशटॅगद्वारे नेटकरी युवराजने माफी मागावी अशी मागणी करत आहेत.
भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा आणि युवराज सिंह यांच्यात गेल्या काही दिवसापासून इन्स्टाग्राम लाईव्ह चॅट सेशन सुरू आहे. या सेशन दरम्यान दोघे क्रिकेट, कोरोना व्हायरस, खासगी आयुष्य आणि भारतीय खेळाडूंवर गप्पा मारत होते. दोघांच्या चॅट दरम्यान, कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल कमेंट करत होते. त्यांच्या कमेंट पाहून यूवराज सिंहने रोहित शर्माशी बोलताना एक जातीवाचक शब्द उच्चारला. तसेच चहलच्या टीकटॉक व्हिडिओची खिल्लीदेखील उडवली होती. युवराजचा हाच वादग्रस्त व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी त्याचा हा व्हिडिओ पाहून तीव्र नाराजी दर्शवत माफीनाम्याची मागणी केली आहे.