घराघरात देशभक्तीचे संस्कार व्हायला हवेत– सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश पुरंदरे यांचे मत
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या वतीने कै.शाहीररत्न किसनराव हिंगे स्मृतीदिन

पुणे : आज आपली घरे ही मंदिरे होण्याऐवजी थिएटर झालेली आहेत. सध्या दिवसरात्र माध्यमांतून आणि मोबाईलमधून ज्ञानवर्धनापेक्षा संस्कृतीचा लोप होताना आपल्याला दिसतो. त्यामुळे घराघरात देशभक्तीचे संस्कार व्हायला हवे, असे मत स्वरुपवर्धिनीचे सचिव व सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश पुरंदरे यांनी व्यक्त केले.
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे कै.शाहीररत्न किसनराव हिंगे यांच्या स्मृतीदिनानिमित्त हिंगे यांचे सहकारी शाहीर नारायण सूर्यवंशी यांचा सन्मान व नमन तूज शाहीरा स्त्री शक्तीचा जागर अंतर्गत हिंगे लिखित स्त्री पराक्रमाचे पोवाडे हा कार्यक्रम आॅनलाईन पद्धतीने झाला.
राजमाता जिजाबाई, अहिल्याबाई होळकर, उमाबाई दाभाडे यांचे चरित्र पोवाडयातून सादर करण्यात आले. यावेळी शाहीर हेमंतराजे मावळे, शाहिरा प्रा.संगीता मावळे, शाहीर महादेव जाधव, शाहीर होनराजराजे मावळे, तेजश्री येळापुरे, मुकुंद कोंडे, अनुजा जोशी, हर्ष येळापुरे, यांसह कलाकार सहभागी झाले होते.
ज्ञानेश पुरंदरे म्हणाले, समाजावरच्या व देशावरील संकटकाळात जेव्हा लोकांना ग्लानी आलेली होती, तेव्हा स्फूर्तीचा जागर मांडण्याचे काम शाहिरांनी केले. देशवासियांना कर्तव्याचे स्मरण देखील शाहिरींनी करुन केले. महाराष्ट्र व देशाच्या कानाकोप-यात शाहिरी जागवत ठेवली, ती शाहीर किसनराव हिंगे यांच्यासारख्या शाहिरांनी. त्यामुळे त्यांच्या कार्याला आपण नमन करायला हवे.
प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंत मावळे म्हणाले, महाराष्ट्र शाहिर परिषद ही संघटना हिंगे यांच्या ४० व्या वाढदिवसाला व शाहिर हिंगे लोककला प्रबोधिनीची स्थापना त्यांच्या ६१ व्या वाढदिवशी झाली. एकाच व्यक्तीच्या वाढदिवशी अशा संस्था स्थापन होणे आणि आजपर्यंत कार्यरत असणे ही एकमेव घटना आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या शाहिरी परंपरेत त्यांचे नाव व कार्य कधीही विस्मृतीत जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.