fbpx
Thursday, September 28, 2023
PUNE

पालिकेच्या गलथानपणामुळे पुणेकर मरणाच्या खाईत : आबा बागुल

पुणे दि. १ – गेल्या ४० वर्षांपासून प्रस्तावित असलेला आणि भविष्यातील पुण्याच्या वाहतुकीसाठी महत्वपूर्ण असणाऱ्या  उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार  [एच. सी. एम. टी. आर] मार्गाबाबत पालिका प्रशासनाचा पुन्हा एकदा गलथानपणाचा कारभार सुरु झाल्याने हा  महत्वाकांक्षी प्रकल्प लांबणीवर पडणार तर आहे शिवाय  जीवघेण्या वाहतुकीत पुणेकरांना मरणाच्या खाईत लोटण्याचाच  हा प्रकार आहे,अशी भूमिका  माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पत्रकार परिषदेत मांडली तसेच या मार्गासाठी निधीच्या पर्यायांचा विचार पालिका प्रशासनाने करावा आणि कोणत्याही स्थितीत हा प्रकल्प पूर्णत्वास न्यावा ;अन्यथा न्यायालयीन लढा दिला जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

यावेळी माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले कि, मागील ४० वर्षांपासून प्रलंबित असलेला पुणे व खडकी कॅंटोन्मेंट अंतर्गत रिंगरोडसाठी  (एचसीएमटीआर)     शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी १९८७च्या विकास आराखड्यामध्येही (डीपी) ‘एचसीएमटीआर’ दर्शविण्यात आला होता. राज्य सरकारने २०१७मध्ये मंजुरी दिलेल्या विकास आराखड्यावर ‘एचसीएमटीआर’ची आखणी (अलाइनमेंट) निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार, महापालिकेने जागतिक स्तरावर निविदा काढल्या मात्र त्या अबोव्ह आल्या आहेत. असे असताना कोरोनाचा प्रादुर्भाव याचा आधार घेऊन हा मार्ग करण्याची आमची क्षमता नाही, ही पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांची भूमिका नक्की कोणाच्या हिताची  आहे ? हा प्रश्नही  महत्वाचा आहे.

गेली १९ – २० वर्षे एचसीएमटीआर रस्त्यासाठी मी स्वतः  पाठपुरावा करीत आहे.  निविदा प्रक्रियेपर्यंत आलेल्या या उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  निधीचा मुद्दा उपस्थित करून  लांबणीवर टाकण्याची भूमिका एकप्रकारे पुणेकरांना मृत्यूच्या खाईत लोटणारी अशीच आहे.प्रशासनाच्या गलथानपणामुळे ही स्थिती ओढवली आहे. ज्यावेळी हा मार्ग प्रस्तावित करण्यात आला, त्यावेळी तो केवळ पाचशे कोटी रुपयात साकारणार होता मात्र प्रशासकीय गलथान कारभारामुळे  आज हा प्रकल्प सहा हजार कोटी रुपयांपर्यंत पोहचला आहे.

भविष्यातील पुण्यासाठी त्यावेळी नियोजनकारानी हा मार्ग प्रस्तावित केला होता ;पण प्रशासन पातळीवर चालढकलचा कारभार आजतागायत सुरु आहे, हे पुन्हा एकदा पालिका आयुक्तांच्या  भूमिकेमुळे अधोरेखित होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्हाला हा मार्ग करता येत नाही ,त्यासाठी निधीचे दिलेले कारणही संयुक्तिक वाटत नाही. त्यात पुणेकरांसाठी महत्वाकांक्षी असलेला हा प्रकल्प लांबणीवर टाकणे, अप्रत्यक्ष रद्द करण्याचा अधिकार पालिका आयुक्तांना  नाही.ज्या निधीचे कारण प्रशासन देत आहे . तेही योग्य वाटत नाही. उलट हा मार्ग पूर्णत्वास नेण्यासाठी निधी कसा उभारला जाईल याचा प्राधान्याने विचार करणे आवश्यक आहे. महापालिकेच्या अनेक जागा सद्यस्थितीत मोकळ्या आहेत, त्या बी. ओ. टी  वर अगर त्यातील काही भूखंडाची पालिका मुख्यसभा आणि राज्यशासनाच्या मान्यतेने विक्री करून हा प्रकल्प मार्गी लावणे सहजशक्य आहे. पण निधीचे कारण देऊन लांबणीवर टाकण्याची म्हणजेच गुंडाळण्याची भूमिका पुणेकरांच्या हिताची नाही. स्वाईन फ्लू असो किंवा आताचा कोरोना आणि जीवघेण्या वाहतूक कोंडीत करदाता  पुणेकर दररोज मृत्यूला सामोरा जात आहे, हे केवळ आणि केवळ प्रशासनाच्या गलथान कारभारामुळेच,ही  वस्तुस्थिती आहे असेही  आबा बागुल म्हणाले.

जिथे गरज नसताना समान पाणीपुरवठ्यासाठी टेंडर काढले गेले आहे. तीन हजार कोटींच्या या प्रकल्पासाठी कर्जरोखेही   उभारले गेले आहे मग   एचसीएमटीआर रस्त्यासाठी वेगळी भूमिका का ? वास्तविक केवळ दहा टक्के भागाला पाणी पोहचत नसताना, समान  पाणीपुरवठा योजना राबविण्याची गरजच काय ? हेही लक्षात घेतले पाहिजे. आज जीवघेण्या वाहतुकीत दररोज पुणेकर मृत्यूशी खेळत आहेत. त्यांचा जीव वाचविणे हे आपले काम आहे. सर्व पक्षनेते यांच्यासमवेत बैठक घेऊन   एचसीएमटीआर मार्ग कसा मार्गी  लावता येईल यासाठी अनेक पर्यायांवर

चर्चा करता येऊ शकते पण आमची क्षमता नाही हे प्रशासनाचे म्हणणे पूर्णतः चुकीचे  आणि ते पुणेकरांना मारक  असेच आहे. जर निधीच्या कमतरतेमुळे हा मार्ग करता येत नसेल तर उद्या  विकास आराखड्यातील लाखो कोटींचे प्रकल्प ही  प्रशासन  रद्द करणार का ?असा सवालही आबा बागुल यांनी केला.

मुळात  एचसीएमटीआर प्रकल्पासाठी सहा हजार कोटी रुपये हे काही एक वर्षात लागतील असे अजिबात नाही. पाच वर्षात हा प्रकल्प पूर्ण होऊ शकतो. त्यामुळे आज  या  एचसीएमटीआर प्रकल्पाबाबत नकारात्मक भूमिका घेऊन कोणत्या बांधकाम व्यावसायिकांचे, उद्योगपतींचे हित जोपासले जाणार आहे हा प्रश्नही उपस्थित होत आहे. त्यामुळे निधी नाही हे कारण अथवा पर्याय महापालिका प्रशासन  देऊ शकत नाही. आज काय, आहे त्याच रस्त्यांवर पुन्हा पुन्हा तीच विकासकामे होत  आहे, निधी खर्च केला जात आहे. त्यामुळे आगामी दोनशे वर्षे पुणेकरांना वाहतुकीसाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या   एचसीएमटीआर  मार्गाबाबत सकारात्मक भूमिका घेण्याची नितांत गरज आहे. त्यात कोणतेही राजकारण होऊ नये. हा सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत प्रश्न आहे,त्यांची  जीवघेण्या वाहतूक कोंडीतून सुटका करणे  हेच महत्वाचे आहे. असेही माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले. 

Leave a Reply

%d bloggers like this: