नेपाळच्या नवीन नकाशात भारताचे तीन भाग
नवी दिल्ली, 1 – भारत आणि नेपाळमधील वाद अद्याप थांबलेला नाही. नवीन राजकीय नकाशाच्या संदर्भात नेपाळ सरकारनं त्यांच्या संसदेत घटना दुरुस्ती विधेयक सादर केलं. नेपाळचे कायदामंत्री शिवमाया तुंबाहंफे यांनी नवीन नकाशासंदर्भात संसदेत विधेयक मांडलं आहे. नेपाळच्या या नवीन नकाशामध्ये भारतातील कालापानी, लिपुलेख आणि लिंपियाधुरा यांचादेखील समावेश आहे.
गेल्या काही दिवसांपासून नेपाळ आणि भारतातील संबंध बरेच चर्चेत आहेत. खरंतर नेपाळ हा भारताचा जुना मित्र आहे. पण असं असलं तरी नेपाळचा नकाशा अद्ययावत करण्यासाठी घटना दुरुस्तीचं नेपाळी काँग्रेसने समर्थन केलं आहे. लिपुलेख, लिम्पियाधुरा आणि कालापानी या वादग्रस्त भागाचा त्याच्या प्रदेशात समावेश करण्यासाठी नेपाळचा नकाशा बदलण्याचं हे पाऊल उचललं जात आहे.
नेपाळने जेव्हा त्यांच्या नवीन राजकीय नकाशामध्ये भारतीय क्षेत्राला आपल्या स्वतःचा भाग म्हणून घोषित केलं तेव्हा भारताकडून यावर प्रतिक्रिया देण्यात आली. परराष्ट्र मंत्रालयानं असं म्हटलं होतं की, नेपाळने भारताच्या सार्वभौमत्वाचा आदर केला पाहिजे.
संपूर्ण घटनाक्रमावर भारताची नजर
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले की, बनावटी कार्टोग्राफिक प्रकाशित करणं टाळा असं आम्ही नेपाळ सरकारला आवाहन केलं आहे. तसंच भारताच्या सार्वभौमत्वाचा आणि क्षेत्रीय अखंडतेचा आदर करा असंही सांगण्यात आलं आहे.
काय आहे वादाचं कारण?
नेपाळ सरकारच्या नव्या नकाशामध्ये कलापाणी, कालापानी, लिपुलेख आणि लिंपियाधुरा यांचा समावेश केल्याबद्दल भारतानं आक्षेप घेतला आहे. नेपाळच्या या सुधारित नकाशाला भूमि संसाधन मंत्रालयानं नेपाळच्या कॅबिनेटच्या बैठकीत जाहीर केलं. हा नकाशा प्रसिद्ध झाला त्यावेळी उपस्थित मंत्रिमंडळ सदस्यांनी या नकाशावर समर्थनार्थ मतदान केलं. त्याच वेळी भारताने यावर त्वरित आक्षेप घेतला.
विशेष म्हणजे 8 मे रोजी भारतानं उत्तराखंडच्या लिपीमधून कैलास मानसरोवरच्या रस्त्याचं उद्घाटन केलं होतं. याबाबत नेपाळकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली. उद्घाटनानंतरच नेपाळ सरकारनं नवीन राजकीय नकाशा जाहीर करण्याचा निर्णय घेतला. यात नेपाळने भारताची क्षेत्रे स्वत: ची म्हणून दाखवली आहेत.