fbpx
Saturday, December 2, 2023
PUNE

महिला उद्योजिकांच्या ‘घे भरारी’ला पाळंदे कुरिअरचा हात

पुणे, दि. 29 – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन झाल्याने सर्वच प्रकारच्या उद्योजकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अनेक महिला उद्योजिका, लघुउद्योजक यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा या छोट्या उद्योगांना पाठबळ देण्यासाठी महिला उद्योजकांच्या ‘घे भरारी’ या संस्थेने पाळंदे कुरिअरच्या साथीने अल्पदरात ‘डिलिव्हरी’ची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे पाळंदे कुरिअरच्या मदतीने महिला उद्योजिका पुन्हा एकदा ‘भरारी’ घेण्यास सज्ज झाल्या आहेत.

या उपक्रमाचा शुभारंभ गुरुवारी कर्वे रस्त्यावरील पाळंदे कुरिअरच्या कार्यालयात चित्रकार व सामाजिक कार्यकर्ते धनंजय देशपांडे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी पाळंदे कुरिअरचे आशिष पाळंदे, ‘घे भरारी’चे राहुल कुलकर्णी, नीलम उमराणी-यदलाबादकर आदी उपस्थित होते.
नीलम उमराणी-एदलाबादकर म्हणाल्या, “महिला व लघु उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी ‘घे भरारी’ या महोत्सवाचे आयोजन केले जाते. २०० ते ३०० महिला उद्योजिका या प्रदर्शनात सहभागी होत असतात. मात्र, यंदा कोरोनामुळे हे प्रदर्शन घेता आले नाही आहे. त्यामुळे या महिलांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पाळंदे कुरिअर यांच्याशी समन्वय करून त्यांच्या उत्पादनांना ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या जात आहेत. अशावेळी या महिला छोट्या उद्योगांतून आपल्या घराला उभारू शकतात. मास्क, सॅनिटायझर, खाद्यपदार्थ, गृहसजावटीच्या वस्तू, हस्तकला, रेडिमेड पदार्थ, डिझायनर ड्रेसेस, हर्बल प्रॉडक्ट्स, आयुर्वेदिक औषधे, लाईफ इन्शुरन्स, होम ऍटोमेशन, घरगुती अत्तरापासून ते कलात्मक वस्तूंपर्यंत, हॅण्डमेड दागिन्यांपासून खेळणी आणि इतर घरगुती उत्पादनापर्यंत सगळे काही ऑनलाईन मागविता येणार आहे.”
धनंजय देशपांडे म्हणाले, “कोरोनामुळे सगळ्यांचेच कंबरडे मोडले आहे. अशावेळी मराठी उद्योजक एकत्रितपणे चांगला उपक्रम राबवत आहेत. याचा अनेकांना फायदा होईल. अधिकाधिक उद्योजकांनी यात सहभागी होऊन डिलिव्हरीची व्यवस्था पाळंदे कुरिअरवर सोपवावी व आपण आपल्या उत्पादनाच्या मार्केटिंगवर भर द्यावा. जेणेकरून व्यवसाय वाढीसाठी त्याचा उपयोग होईल. यातून नोकरीच्याही अनेक संधी निर्माण होतील. त्याचाही लाभ मराठी तरुणांनी घ्यायला हवा.”
आशिष पाळंदे म्हणाले, “कुरिअर सेवा देण्याची आमची ५० वर्षांची परंपरा आहे. आता या कोरोनाच्या संकटातून पुन्हा एकदा भरारी घेण्यासाठी अनेक छोट्या उद्योजकांशी संलग्न होऊन त्यांना अल्पदरात कुरिअर सेवा पुरवण्याचा प्रयत्न आहे. पुण्यासह ग्रीन झोनमध्ये ६० रुपये ऐवजी ३५ रुपयात ही कुरिअर सेवा उपलब्ध होणार आहे. पुढील किलोसाठी १० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीकर कुरिअर सेवा देताना सुरक्षेची सर्व काळजी घेतली जाणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: