fbpx
Monday, June 17, 2024
MAHARASHTRA

आंबा उत्पादकांनी तोडली दलालांची साखळी

सिंधुदुर्ग, दि. २८  : कोरोनाच्या संकटामुळे सध्या सर्व देश लॉकडाऊन आहे. त्यामुळे अनेक उद्योग व व्यापार यांना याचा फटका बसला आहे. या संकटातून शेतकरी ही सुटलेला नाही. पण, हेच कोरोनाचे संकट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक बागायत दारांसाठी इष्टापत्ती ठरले आहे. या कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे आंबा उत्पादकही अडचणीत आला होता. पण, कृषि विभागाने दिलेली साथ, पणन मंडळाने घेतलेली जबाबदारी व आंबा उत्पादक यांनी मिळून या संकटातून फक्त मार्गच काढला नाही तर चांगला फायदा मिळणवून देणारा एक नवा पायंडा पाडला आहे.

कोकणातील सर्वात महत्त्वाचे फळपिक म्हणजे आंबा. मार्चपासून आंब्याचा हंगाम सुरू होतो. तो सुमारे जूनच्या मध्यापर्यंत चालतो. पण, नेमके याच काळात कोरोनामुळे देशात लॉकाडाऊन सुरू झाले आणि आंबा उत्पादक शेतकरी हवालदील झाला. जिल्ह्यांच्या, राज्यांच्या सिमा बंद झाल्या. त्यामुळे आता आंबा विक्री कशी करायची या एक मोठा प्रश्न त्याच्यासमोर उभा ठाकला.

यावर जिल्हा प्रशासन, जिल्हा कृषि विभाग व पणन महामंडळाने एक तोडगा काढला. शेतकऱ्यांनी त्यांचा आंबा स्वतः बाजारात नेऊन विकावा. त्यासाठी शेतकऱ्यांना व आंब्याची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांना पासचे वाटप करण्यात आले. त्यांना मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा यासारख्या शहरांमध्ये आंबा विक्रीसाठी परवानगी दिली. तसेच पणन मंडळाने आंब्याची ऑनलाईन विक्रीही सुरू केली. त्यासाठी बुकिंग घेण्यास सुरुवात केली. या सर्व प्रयत्नांना यश येऊन आंब्याच्या विक्रीला सुरुवात झाली. सुरुवातीस शेतकरी जेवढे मिळेत तेवढे ठिक अशा भावनेने आंबा विक्री करत होते.

या सर्व प्रयत्नांचा एक चांगला फायदा शेतकरी व ग्राहक या दोन्ही घटकांना झाल्याचे दिसून आले व आंब्याच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली. यंदाच्या वर्षी आंब्याच्या पेटीला सुमरे 1 हजार आठशे ते 2 हजार रुपये भाव मिळत आहे. हा भाव शेतकऱ्यांकडून थेट खरेदी होणाऱ्या आंब्यास मिळत आहे. तर ग्राहकांनाही अवघ्या 2 हजार ते 2 हजार  200 रुपयांमध्ये पेटी मिळत आहे.

गेल्या वर्षीच्या हंगामाचा विचार करता यावर्षीच्या नवीन पद्धतीने होणाऱ्या विक्रीमध्ये शेतकऱ्यांना सुमारे 800 ते एक हजार रुपये जादाचा भाव मिळत आहे. दरवर्षी दलालांमार्फत खरेदी होताना पेटीला सुमारे 800 रुपये ते 1000 रुपये दर शेतकऱ्यांमा मिळत होता.

देवगड तालुक्यातील 400 कलमांचे मालक असणारे विष्णू राजाराम डगरे सांगतात दरवर्षी दलालांकडे आंबा विक्रीसाठी पाठवत होतो. त्यावेळी आठशे रुपयांना एक पेटी असा दर असे. तसेच वाहतुकीमध्ये खराब होणाऱ्या आंब्याची नुकसानीही शेतकरीच सोसत होता. त्यामुळे नफा कमी मिळत होता. पण यंदा कृषि विभाग व पणन मंडळाने केलेल्या प्रयत्नांमुळे आंबा थेट ग्राहकांना विक्री करत आहे. सध्या आंब्याला चांगला दर मिळत आहे. ग्राहक जागेवर 2 हजार रुपये पेटी प्रमाणे दर देत आहे. हा सर्व व्यवहार रोखीने होत असल्यामुळे तसेच जागेवर आंबा उचल होत असल्यामुळे शेतकऱ्यांचा चांगला फायदा होत आहे. दलाल रोखीचा व्यवहार करत नसत. त्यामुळे त्यांच्याकडे पैसे मिळण्यासाठी अनेक चकरा माराव्या लागत. संपूर्ण पैसा मिळेलच याची शाश्वती नसे. पण आता चांगला नफा मिळत आहे. यंदाच्या वर्षीची ही आंबा विक्रीची पद्धत कायम रहावी असे मतही त्यांनी व्यक्त केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील अनेक बागायतदारांचे मत अशाच पद्धतीचे आहे. एका कलमामागे सुमारे 10 पेटी आंबा तयार होतो. तर सुमारे 100 कलमांपाठीमागे शेतकऱ्याचा वर्षाला 1 ते सव्वा लाख रुपये खर्च होतो. हा सर्व खर्च जाऊन शेतकऱ्याला दलालांमार्फत होणाऱ्या व्यवहारामध्ये सुमारे 8 लाख रुपये वार्षिक मिळत होते. पण, यंदा आंब्याच्या व्यवसायात आतापर्यंत 10 लाख रुपये 100 कलमांमागे कमाई झाली आहे. तर एकूण सुमारे 16 ते 18 लाख रुपये वार्षिक कमाई होण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहे. यातून वाहतूक खर्च वगळला तरी एक चांगला नफा शेतकऱ्यांच्या पदरात पडणार हे नक्की.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading