हर्षवर्धन जाधव यांची राजकारणातून निवृत्ती, मनसेला धक्का

औरंगाबाद: औरंगाबादमधील मनसेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांनी राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. दुपारी त्यांनी फेसबुक पेजवरुन हा व्हिडीओ शेअर केल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. हर्षवर्धन जाधव यांनी अलीकडेच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेत अधिकृतरित्या प्रवेश केला होता. त्यानंतर जाधव यांच्याकडे औरंगाबादच्या ग्रामीण भागाची जबाबदारी देण्यात आली होती.

हर्षवर्धन जाधव हे कन्नड तालुक्यातील मनसेचे पहिले आमदार होते. त्यानंतर पक्षांतर्गत नाराजीमुळे त्यांनी मनसे सोडून शिवसेनेत प्रवेश केला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेचा राजीनामा देत स्वत:चा राजकीय पक्षदेखील काढला होता. त्याचसोबत २०१९ च्या औरंगाबाद लोकसभेतून अपक्ष म्हणून हर्षवर्धन जाधव यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतल्याने शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. हर्षवर्धन जाधव हे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत.

हर्षवर्धन जाधव यांनी सोशल मीडियात व्हिडीओ शेअर केला त्यात त्यांनी म्हटलं आहे की, लॉकडाऊन सुरु आहे, सर्वजण आपापले छंद जोपासत आहे. मीदेखील आध्यात्मिक वाचनाचा छंद जोपासला, आपण ज्या गोष्टींसाठी विनाकारण पळत राहतो त्या कितपत खऱ्या आहेत याची जाणीव मला झाली. त्यामुळे मी राजकारणातून निवृत्त होत असल्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या राजकारणाची उत्तराधिकारी म्हणून पत्नी संजना जाधव यांची निवड केली आहे.

तसेच प्रत्येक घरात कुरघोडी होत असतात, आमच्याही घरात झाल्या, पण याचा अर्थ असा नाही की वेगळ्या गोष्टी घडत असतील. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वात संजना जाधव निश्चित चांगल्याप्रकारे काम करेल, यापुढे काही सामाजिक, राजकीय, शासकीय मदतीसाठी संजना जाधव यांच्याशी थेट संपर्क साधावा, मीदेखील खंबीरपणे संजनाच्या पाठिशी उभा आहे असं हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले आहे. मागील काही दिवसापासून जाधव परिवारात सलोख्याचे वातावरण नव्हते, कुटूंब वादातून पोलीस ठाण्यापर्यंत तक्रार करेपर्यंत प्रकरण ताणले गेले होते. हर्षवर्धन यांच्या आई तेजस्विनी जाधव आणि सून संजना यांनी परस्पर विरोधात तक्रार केली होती. दरम्यान हर्षवर्धन यांनी कुटुंबातील वादावर एका जाहीर प्रगटनातून वाचा फोडली होती.

अलीकडेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतल्याने हर्षवर्धन जाधव यांनी पुन्हा मनसेचा झेंडा हाती घेतला होता. औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने मनसेनेही हर्षवर्धन जाधव यांना पक्षात घेऊन जिल्ह्यात पक्षवाढीसाठी प्रयत्न केला. पण हर्षवर्धन जाधव यांनी अचानक राजकारणातून निवृत्ती घेतल्याची घोषणा केल्याने मनसेसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: