सोनाली कुलकर्णीचा झाला साखरपुडा

मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ अर्थातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने वाढदिवसानिमित्त चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. सोनालीने होणाऱ्या पतीसोबतचा फोटो पोस्ट करत साखरपुडा झाल्याची माहिती दिली. २ फेब्रुवारी रोजी हा साखरपुडा पार पडला होता. ज्या व्यक्तीसोबत सोनाली आयुष्यभराचे नाते जोडणार आहे, त्या व्यक्तीचं नाव कुणाल बेनोडेकर असं आहे.
साखरपुड्याचा फोटोसुद्धा सोनालीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. ‘माझा वाढदिवस संपण्यापूर्वी मला एक खास घोषणा करायची आहे. माझ्या फियान्सेची ओळख तुम्हाला करून द्यायची आहे. २ फेब्रुवारी रोजी आमचा साखरपुडा झाला आणि आमचा हा आनंद तुम्हा सगळ्यांसोबत वाटण्यासाठी आजच्या पेक्षा योग्य दिवस असूच शकत नाही असं मला वाटतं. आपले शुभाशीर्वाद कायम पाठीशी असू द्या’, असं सोनालीने या फोटोसोबत लिहिलं आहे. वाढदिवसाच्या एक दिवस आधी सोनालीने २ फेब्रुवारी २०२० या तारखेची एक पोस्ट इन्स्टाग्रामवर टाकली होती. मात्र ही तारीख तिने का पोस्ट केली याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. आता त्या तारखेच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
फेब्रुवारी महिन्यातच सोनालीच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं होतं. सोनालीच्या तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता आणि त्यावरून तिच्या लग्नाच्या चर्चांना सुरुवात झाली होती.
‘हिरकणी’, ‘धुरळा’, ‘विकी वेलिंगकर’ असे एकापाठोपाठ एक सोनालीचे चित्रपट प्रदर्शित झाले. या चित्रपटांमधील तिच्या अभिनयाचंही प्रेक्षक-समीक्षकांकडून कौतुक झालं. सोनालीने याआधीही तिच्या रिलेशनशिपबद्दल माहिती दिली होती. आता तिच्या लग्नाच्या तारखेची घोषणा कधी होणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
