पुण्यातील ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंची मदत
पुणे : कोविड -१९ च्या संकटाने ईशान्य भारतातील राज्यांतून पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांवर लॉकडाऊनच्या काळात गंभीर परिस्थिती ओढवली. तसेच काही ठिकाणी नागरिकांकडून त्यांची ‘चायनीज कोरोना’ म्हणून अवहेलना होत असल्याने बाहेर पडणेही अशक्य झाले आहे. अशा पुण्यात विविध भागांत वास्तव्यास असलेल्या सुमारे २०० विद्यार्थ्यांना जोशी फाऊंडेशन ट्रस्टतर्फे आणि ग्राहक पेठेच्या सहकार्याने जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या.
मणिपूरच्या सचिवांकडून आलेल्या विनंतीची दखल घेऊन फाउंडेशन ने ग्राहक पेठेच्या मदतीनेया विद्यार्थ्यांसाठी तीन ते चार आठवडे पुरेल इतक्या जीवनावश्यक गोष्टींच्या बॅग तयार केली. पोलीस यंत्रणेच्या मदतीने वस्तूंच्या बॅग विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आल्या. शिरीष दाते, सूर्यकांत पाठक यांनी याकरीता पुढाकार घेतला. सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पौर्णिमा गायकवाड खंडारे, बच्चन सिंग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर यांनी सहाय्य केले. यामध्ये भवानी पेठ व कोंढवा या भागात स्वत: पोलिसांनी या वस्तू नेऊन दिल्या.
जोशी फाऊंडेशनचे अरुण जोशी म्हणाले, मी अमेरिकेत असताना पुण्यातील नॉर्थ ईस्ट इंडियाच्या विद्यार्थ्यांनी मदतीसाठी संपर्क केला. त्यामुळे पुण्यातील संस्थाना मी मदतीसाठी विचारणा केली. जोशी फाऊंडेशन ट्रस्ट आणि ग्राहक पेठ यांनी विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंची मदत केली. आपल्या भारतीय बांधवांची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. नागालँड अथवा त्रिपुरा येथून सुद्धा मदतीची नवीन येणारी मागणी आम्ही पूर्ण करू, असेही ते म्हणाले.
