Friday, April 17, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

बंडगार्डन पोलिसांचा गुन्हा दाखल करण्यास नकार; उपायुक्तांच्या आदेशाला केराची टोपली, राहुल डंबाळे मंगळवारी उच्च न्यायालयात धाव घेणार

पुणे: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ससून रुग्णालयासारख्या ‘सायलेन्स झोन’मध्ये डीजेचा धणधणाट करून कायदाभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात बंडगार्डन पोलीस अपयशी ठरले आहेत. पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांनी गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट आदेश पोलीस निरीक्षकांना दिले असतानाही, ७२ तास उलटूनही बंडगार्डन पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. पोलिसांच्या या जाणीवपूर्वक दुर्लक्षाविरोधात मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते राहुल डंबाळे यांनी दिली आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली
राहुल डंबाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ससून रुग्णालय परिसरात झालेल्या नियमांच्या उल्लंघनाबाबत त्यांनी पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांची भेट घेतली होती. यावेळी शिवणकर यांनी “संबंधित प्रकरणावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश बंडगार्डन पोलीस निरीक्षकांना यापूर्वीच दिले आहेत” असे स्पष्ट केले होते. मात्र, वरिष्ठांचे आदेश होऊनही स्थानिक पोलीस प्रशासन या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असून दोषींना पाठीशी घालत असल्याचा आरोप डंबाळे यांनी केला आहे.

७२ तासांपासून कारवाईची प्रतीक्षा
जयंती उत्सवादरम्यान झालेल्या आवाजाच्या मर्यादेबाबत १२ एप्रिलपासून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. ७२ तास उलटूनही बंडगार्डन पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत आहेत. “एकीकडे भीमसेवा प्रतिष्ठानने ३० फुटी बुद्धमूर्ती उभारून आणि डीजेला फाटा देऊन शांततेत अभिवादन करण्याचा आदर्श जपला, तर दुसरीकडे पोलीस प्रशासन कायदा मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करून वैचारिक उत्सवाला गालबोट लावत आहे,” अशी भावना डंबाळे यांनी व्यक्त केली.

मंगळवारी उच्च न्यायालयात याचिका
बंडगार्डन पोलिसांच्या या निष्क्रियतेची आणि वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान केल्याची गंभीर दखल घेत, राहुल डंबाळे यांनी आता न्यायालयीन लढाईचा पवित्रा घेतला आहे. येत्या मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल केली जाणार आहे. यामध्ये दोषी मंडळांसोबतच, ७२ तास उलटूनही गुन्हा दाखल न करणाऱ्या आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जाणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading