Tuesday, June 9, 2026
Latest NewsPUNE

‘संवाद’, कावरे आईस्क्रिम आयोजित बालचित्रपट महोत्सवाला ‘क्रांति ज्योती विद्यालय’ने सुरुवात

 

पुणे : संवाद पुणे आणि कावरे आईस्क्रिमतर्फे आयोजित बालचित्रपट महोत्सवाला आज (दि. १७) ‘क्रांति ज्योती विद्यालय’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाने सुरुवात झाली. शालेय विद्यार्थी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आकाशात फुगे सोडून चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन करण्यात आले. चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
महोत्सव दि. १७ ते २३ एप्रिल या कालावधीत सीटी प्राईड, कोथरूड येथे आयोजित करण्यात आला आहे. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त बालसाहित्यकार ल. म. कडू, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, ‘कर्मवीरायण’ चित्रपटाचे दिग्दर्शक धनंजय भावलेकर, कावरे आईस्क्रिमचे राजूशेठ कावरे, संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, महोत्सवाच्या सूत्रधार निकिता मोघे, संयोजक केतकी महाजन-बोरकर, जान्हवी कावरे उपस्थित होते. गेल्या २६ वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांसाठी महोत्सवाचे विनामूल्य आयोजन करण्यात येत आहे.
महोत्सवाअंतर्गत १८ रोजी रणपती शिवराय, दि. १९ रोजी अभंग तुकाराम (दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर), दि. २० रोजी अवकारिका (दिग्दर्शक अरविंद भोसले), दि. २१ रोजी चिकीझिंग (दिग्दर्शक राजेंद्र बगाटे, वैभव कुलकर्णी), दि. २२ रोजी कर्मवीरायण (दिग्दर्शक धनंजय भावलेकर), दि. २३ रोजी ताजमहाल (दिग्दर्शक नियाज मुजावर) हे चित्रपट दाखविले जाणार आहेत.
ल. म. कडू म्हणाले, सातत्याने केवळ मुलांसाठी चित्रपट महोत्सव विनामूल्य आयोजित करणे सोपी गोष्ट नाही. महोत्सवाच्या निमित्ताने मुलांना सुंदर सिनेमे बघण्याची संधी उपलब्ध झाली आहे. हा उपक्रम आयोजित केल्याबद्दल संवाद, पुणेचे सुनील महाजन आणि कावरे आईस्क्रिमचे राजूशेठ कावरे यांचे अभिनंदन करायला हवे.

संस्कृती बालगुडे म्हणाली, लहानपणापासून महोत्सवात अनेक चित्रपट बघण्याची संधी मिळाल्याने चित्रपट क्षेत्रात करिअर करण्यासाठी महोत्सवाचा खूप उपयोग झाला. मराठी चित्रपट पाहण्यासाठी पालक मुलांना घेऊन येत आहेत, त्या बद्दल पालकांचे अभिनंदन.

धनंजय भावलेकर म्हणाले, सध्याच्या काळातील समाज माध्यमांचा वाढता प्रभाव बघता मराठी चित्रपटांना उभारी मिळण्यासाठी महोत्सव निश्चितच उपयोगी ठरतात.

मुलांना आनंद मिळवून देण्यासाठी दरवर्षी चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. भविष्यातही मुलांना चांगले चित्रपट पहायला मिळावेत यासाठी सहकार्य करू अशी ग्वाही जान्हवी कावरे यांनी दिली.

सुनील महाजन यांनी प्रास्ताविकात उपक्रमाची माहिती सांगितली. निकिता मोघे यांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांचे स्वागत राजूशेठ कावरे, जान्हवी कावरे यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading