अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना जीवे मारण्याची धमकी; गोल्डी ढिल्लोचे महाराष्ट्र पोलिसांना आव्हान, मुंबईत २०० साथीदार असल्याचा दावा
मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचे पुत्र अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कुख्यात गँगस्टर गोल्डी ढिल्लो याने दोघांना जीवे मारण्याची धमकी दिली असून, बुलेटप्रूफ सुरक्षेतही त्यांना लक्ष्य करू शकतो, असा इशारा दिला आहे. अमिताभ बच्चन यांच्या जलसा निवासस्थानावर हल्ल्याचा कथित कट रचल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दोन संशयित शूटरना अटक केल्यानंतर ही धमकी समोर आली आहे.
विकास ठाकूर आणि दीपक सिंह या दोघांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईनंतर परदेशात असल्याचे सांगितले जाणाऱ्या गोल्डी ढिल्लोने सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करून महाराष्ट्र पोलिसांनाच आव्हान दिले. दोन शूटरना अटक केल्याने हल्ल्याचा कट उधळला असे समजू नये, असा दावा त्याने केला आहे. मुंबईत आपले आणखी २०० साथीदार सक्रिय असल्याचे सांगत अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांना बुलेटप्रूफ केबिनमध्येही लक्ष्य करता येऊ शकते, अशी धमकी त्याने दिली.
या धमकीचा संबंध १९८४ मधील शीखविरोधी दंगलींशी जोडला जात आहे. त्या काळात अमिताभ बच्चन यांनी कथितरीत्या चिथावणीखोर घोषणा दिल्याचा आरोप काहींकडून करण्यात आला होता. मात्र, अमिताभ बच्चन यांनी हे आरोप अनेकदा फेटाळून लावले आहेत.
दरम्यान, या धमकीच्या पार्श्वभूमीवर अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर ‘बच गये’ अशी पोस्ट केल्याने त्यांच्या सुरक्षेबाबत चर्चेला उधाण आले आहे. मुंबईतील त्यांच्या जलसा निवासस्थानाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून, खासगी सुरक्षा व्यवस्थाही अधिक सतर्क करण्यात आली आहे.
दोन संशयितांना अटक होऊनही गुन्हेगारी टोळ्यांकडून अशा प्रकारे उघड धमक्या दिल्या जात असल्याने मुंबई पोलिसांसमोर आणि राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे.
