पर्णकुटी स्वयंसेवी संस्थेकडून गरजू महिलांना व्यवसाय किट्स वाटप
पुणे, प्रतिनिधी :
महिला सशक्तीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत पर्णकुटी या स्वयंसेवी संस्थेने कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या साठ महिलांना व्यवसाय किट्सचे वितरण केले. हा उपक्रम एचडीएफसी बँकेच्या सीएसआर कार्यक्रमांतर्गत ‘परिवर्तन स्मॉल ग्रँट्स प्रोग्राम (SGP)’च्या माध्यमातून राबविण्यात आला असून, भारत केअर्स यांच्या सहकार्याने पूर्णकुटीने त्याची अंमलबजावणी केली.
या प्रकल्पांतर्गत वंचित घटकांतील महिलांना कोणत्याही प्रारंभिक गुंतवणुकीशिवाय स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सक्षम करण्यात आले. महिलांनी नेल आर्ट आणि मेहंदी, मेकअप, मसाला बनवणे, चॉकलेट बनवणे आणि बेकरी उत्पादने अशा विविध व्यवसायाभिमुख प्रशिक्षणांमध्ये सहभाग घेतला. प्रशिक्षणादरम्यान महिलांना केवळ कौशल्यच नव्हे, तर उद्योजकता, आर्थिक साक्षरता आणि डिजिटल प्रशिक्षणही देण्यात आले. त्यामुळे लघुउद्योग सुरू करून तो प्रभावीपणे चालवण्याचा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झाला आहे. वेगवेगळ्या कौशल्याधारित व्यवसाय किट्समुळे महिलांना त्वरित स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. विशेषतः मसाला, चॉकलेट आणि बेकरी उत्पादनांमध्ये प्रशिक्षित महिलांना उत्पादन विकास, पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यासाठी पर्णकुटीकडून पुढील मार्गदर्शन दिले जाणार आहे. तसेच सौंदर्य व मेहंदी प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना सलून, कार्यक्रम आणि सणासुदीच्या बाजारपेठांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
अर्बन कंपनी आणि एस मॅडम सारख्या अॅप्सवर नोंदणी करून उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार आहेत. कार्यक्रमादरम्यान देण्यात आलेल्या पोषण किट्समुळे महिलांच्या आरोग्यातही सुधारणा झाली असून, त्यांच्या सहभागात वाढ झाली आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश महिलांच्या कुटुंबीय उत्पन्नात वाढ करणे, आर्थिक अवलंबित्व कमी करणे आणि सामाजिक व आर्थिक समावेशनाला चालना देणे हा आहे. पर्णकुटी स्वयंसेवी संस्थेच्या सह-संस्थापक व सचिव स्नेहा भारती यांनी सांगितले, की या किट्सचे वितरण हे महिलांच्या नव्या प्रवासाची सुरुवात आहे. त्यांच्या यशासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू.
